सीबीएससीने (CBSC) इयत्ता दहावी आणि बारावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र विषयातील काही महत्त्वाचे धडे काढून टाकले आहेत. या प्रकारानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीबीएससी बोर्डासह भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सीबीएससीचा उल्लेख ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सप्रेसिंग एज्युकेशन’ अर्थातच शिक्षणाला दडपणारी संस्था असा केला आहे.
त्याचबरोबर अभ्यासक्रमात बदल करण्यावरून राहुल गांधी यांनी सीबीएससीसोबतच आरएसएसवर (राष्ट्रीय स्वयंसेवक दल) देखील निशाणा साधला आहे. त्यांनी आरएसएसला ‘राष्ट्रीय शिक्षा श्रेडर’ अर्थातच शिक्षणाचं वाटोळं करणारी संस्था असं म्हटलं आहे. आज सकाळी राहुल गांधींनी याबाबतचं ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये एक कागद कापणारी मशीन आहे. जी लोकशाही, विविधता, जागतिकीकरणाचा शेतीवर झालेला परिणाम, अलिप्ततावादी चळवळ, मुघल साम्राज्य, औद्योगिक क्रांती आणि फैज अहमद फैज यांची कविता कापताना दिसत आहे.
संबंधित मशीन ही आरएसएस असून ती रोजगार, जातीय सलोखा आणि संस्थांचे स्वातंत्र याबाबत संदेश देणारे धडे कापताना दिसत आहे. सीबीएससी बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र पुस्तकातील आफ्रिका आणि आशिया खंडातील मुघलांचं साम्राज्य, शीतयुद्ध आणि औद्योगिक क्रांतीबाबत माहिती देणारे धडे काढून टाकल्यानंतर राहुल गांधी यांनी संबंधित ट्वीट केलं आहे. राहुल गांधींचं हे ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आहे.
भाजपाने पेरलेल्या विषाची किंमत प्रत्येक भारतीय नागरिकाला मोजावी लागतेय- राहुल गांधी
तत्पूर्वी राहुल गांधी यांनी देशात द्वेष निर्माण करण्यावरून भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. संबंधित ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, “भाजपा आणि आरएसएसने पेरलेल्या विषाची किंमत प्रत्येक भारतीय नागरिकाला मोजावी लागत आहे.” या ट्वीटसोबत त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेला लेख देखील शेअर केला होता.