Rahul Gandhi On Trump Tariffs : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांना अडचणीत आणणारे निर्णय घेतले आहेत. रशियाकडून स्वस्त दरात खनिज तेलाची आयात भारत करत असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादलेलं आहे. एवढंच नाही तर जोपर्यंत भारत रशियाकडून खनिज तेलाची आयात बंद करत नाही, तोपर्यंत टॅरिफ हटवलं जाणार नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिका आणि भारतामधील व्यापार संबंधात तणाव निर्माण झालेला आहे. ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून याचा भारताला मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे. यावरूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राहुल गांधी हे एका कापड उद्योगाला भेट देत माहिती जाणून घेत असल्याचं दिसत आहे. यावर भाष्य करत अमेरिकन टॅरिफमुळे भारतातील ४.५ कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात असल्याचा दावा करत यासाठी फक्त पंतप्रधान मोदी हेच जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ असं संबोधलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटलं की, “५० टक्के अमेरिकन टॅरिफ आणि अनिश्चितता यामुळे भारतातील कापड निर्यातदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकांनी नोकऱ्या गमावणं, उद्योग व्यवसायाचे कारखाने बंद होणं आणि ऑर्डरमध्ये घट ही आपल्या ‘मृत अर्थव्यवस्थेची’ वास्तविकता आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी कोणताही दिलासा दिलेला नाही किंवा अमेरिकन टॅरिफबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, जेव्हा ४.५ कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात आहेत. पण या सर्व गोष्टींना फक्त मोदी तुम्हीच जबाबदार आहात, कृपया याकडे लक्ष द्या”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
