Rahul Gandhi attack on Bhagwant Mann: पंजाब विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंजाबमधील अमली पदार्थांविरोधात लढाई लढण्यात ते अपयशी ठरल्याचा ठपका ठेवताना राहुल गांधी म्हणाले की, भगवंत मान जेव्हा लोकसभेत यायचे तेव्हा त्यांच्या तोंडाला दारूचा वास येत असे.
पंजाबच्या संग्रुर येथे ‘इन्साफ रॅली’ला संबोधित करत असताना राहुल गांधी यांनी आम आदमी पक्षावरही टीका केली. ‘आप’ सरकारला दिल्लीतून नियंत्रित केले जात असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी त्यांच्या अमली पदार्थविरोधी लढ्यातील क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लोकसभेत त्यांच्या तोंडाला वास यायचा
भगवंत मान मुख्यमंत्री होण्यापूर्वी पंजाबमधून खासदार म्हणून निवडून आले होते. तेव्हाच्या दिवसांची आठवण सांगताना राहुल गांधी म्हणाले, “भगवंत मान तेव्हा लोकसभा सभागृहात आमच्या शेजारी बसायचे आणि हास्यविनोद करायचे. त्यावेळी सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांच्या तोंडाला दारूचा वास येत असे.”
ही आठवण सांगितल्यानंतर राहुल गांधी पुढे म्हणाले की, मद्य घेणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने राज्याच्या व्यसनाधीनतेच्या विरोधातील लढ्याशी सुसंगत असायला हवे.
“भगवंत मान यांनी मद्य घेऊ नये, असे मी सांगणार नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्यांना मद्य घ्यायचेच असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. पण जर तुम्हाला व्यसनाधीनतेविरोधात लढाई लढायची असेल तर तुमचा मुख्यमंत्री रोज संध्याकाळी मद्याच्या अमलाखाली असणारा नको. तुम्हाला असा मुख्यमंत्री हवा आहे, जो पंजाबसाठी लढेल. ज्याला अमली पदार्थामुळे होणाऱ्या नुकसानाची जाणीव असेल, पंजाबच्या हृदयातील जखम त्याला स्वस्थ बसू देणार नाही, असा व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून हवा”, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
पंजाब सरकार दिल्लीतून चालते
राहुल गांधी यांनी पुढे आरोप केला की, पंजाबचे सरकार दिल्लीतून चालवले जाते. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राज्य सरकारवर अंकुश आहे.
“लोकांना पंजाबसाठी काम करणाऱ्या लोकांचे सरकार हवे आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास ते दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणार नाही. आमचा पक्ष पंजाबचे सरकार पंजाबमधूनच चालवेल”, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.
