यूजीसी नेट चाचणीच्या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केली. नीटनंतर एनटीएवर यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा ही नामुष्की ओढवली आहे. या प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींनी काय म्हटलं आहे?
मोदीजी, तुमच्या एनटीनएने काय केलं आहे बघा. यूजीसी नेटच्या इंग्रजी, समाजशास्त्र आणि कॉमर्स विषयांच्या परीक्षा २२ ते ३० जूनच्या दरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर आता साधारण दोन महिने झाल्यावर या परीक्षा रद्द करण्यात आल्या कारण त्यांच्याकडून म्हणजे एनटीएकडून चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. जुन्या प्रश्नांचीच पुनरावृत्ती त्यामधअये होती. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारी केली होती. अर्ज भरले, फी भरली, दूरवर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊन पेपर दिले. आता त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा हा सगळा त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय दिलेला पेपर रद्द झाला याचा मनस्तात कसा भरुन काढणार? एनटीएने चूक केली आणि शिक्षा विद्यार्थ्यांना का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या का हे देखील सांगितलं गेलं नाहीये-राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले, कोटामध्ये, डेहराडूनमध्ये, प्रयागराजमध्ये मी हे सांगितलं आहे तसंच पुढेही सांगत राहीन. की देशात आता शिक्षण व्यवस्था अशी काही राहिलेली नाही. हे एक एक्स्ट्रॅक्शन मशीन झालं आहे. तुमचे पैसे, तुमची वर्षे, तुमची मेहनत, तुमचं मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास सगळं काही हिरावून घेते. त्या बदल्यात काहीच मिळत नाही. नोकरीही मिळत नाही असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. परीक्षा होण्यापूर्वी या प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या का याचं उत्तरही एनटीएने दिलेलं नाही असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
सहाय्यक प्राध्यापाक आणि पीएचडी अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाते. २२ ते ३० जून दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्याबाबतच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं समिती आढळलं. त्यानंतर तीन विषयांची परीक्षा परत घेतली जावी अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. ज्यावरुन आता राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
