नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी ‘एआय’ परिषदेतील आंदोलनावरून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईवर तीव्र टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची तुलना उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीशी केली. ‘हा भारत आहे, उत्तर कोरिया नाही, शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा आत्मा आहे, तो गुन्हा नाही,’ असे राहुल यांनी ‘एक्स’वर हिंदीत प्रसिद्ध केलेल्या संदेशातून म्हटले आहे.
‘सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात शांततेत आंदोलन करणे हा मोठा गुन्हा ठरत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला हळूहळू अशा दिशेने ढकलले जात आहे जिथे मतभेदाला देशद्रोह आणि प्रश्न विचारण्याला षडयंत्र म्हटले जात आहे,’ असे राहुल पुढे म्हणाले. ‘जेव्हा सत्तेत बसलेले लोक स्वत:लाच राष्ट्र समजू लागतात आणि विरोधी विचारांना शत्रू मानतात तेव्हा लोकशाही अखेरची घटका मोजते. विचार करा, जेव्हा तुम्ही सत्तेत बसलेल्यांच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आवाज उठवता, तेव्हा लाठीमार, खटले आणि तुरुंगवास अटळ आहे, ’ असे राहुल यांनी नमूद केले.
पेपरफुटीमुळे त्रस्त झालेल्या तरुणांनी आपल्या भविष्यासाठी आवाज उठवला, तेव्हा त्यांना लाठ्यांचा प्रसाद मिळाला. देशाच्या अभिमान असलेल्या महिला कुस्तीगिरांनी भाजपच्या एका मोठ्या नेत्याविरुद्धच्या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. त्यांच्या आक्रोशाला बदनाम करण्यात आले, त्यांचे आंदोलन चिरडले गेले आणि त्यांना रस्त्यावरून जबरदस्तीने हटवण्यात आले,’ असे गांधी म्हणाले.

