Rahul Gandhi criticizes PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी युद्धकाळात सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. या भाषणावर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सडकून टीका आहे. देशाचं परराष्ट्र धोरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पर्सनल धोरण असून त्याला युनिवर्सल जोक म्हटलं आहे. संसदेच्या बाहेर ते माध्यमांशी बोलत होते.

“आपलं जे परराष्ट्र धोरण (Foreign Policy) आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक धोरण (Personal policy) आहे. याचा निकाल तुम्ही पाहू शकता. हा युनिवर्सल जोक आहे. प्रत्येकजण याला युनिवर्सल जोक मानत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांना माहितेय की…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत, हे डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलं माहितेय. त्यामुळे पंतप्रधान तडजोड करतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणातही तडजोड होते. हे सर्वांना दिसतंय”, अशी टीकाही त्यांनी केली.

कोविडमध्ये जे झालं ते मोदी विसरले

“मोदींनी युएस डिल केलं. काल असंबंधित भाषण केलं. भारताचे पंतप्रधान आहेत ते. भारताचे पंतप्रधान वाटले पाहिजे ते. दु:खाची बाब आहे की यामुळे लोकांना नुकसान होणार आहे. आता तर सुरुवात झाली आहे. एलपीजी, पेट्रोल, फर्टिलायजर या प्रत्येक गोष्टीत संकट येणार आहे. कोविडसारखी वेळ येणार आहे, असं मोदी म्हणाले. कोविडमध्ये जे केलं होतं, ते हे विसरले आहेत. किती लोक मेले होते? काहीच समजत नाही”, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या इराण युद्धावर चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, यावर राहुल गांधी म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत मी नसेन. तेव्हा मी केरळात आहे. पण सर्वपक्षीय बैठक झाली पाहिजे. चर्चा झाली पाहिजे. पण तुम्ही पूर्ण ढाचाच उडवला आहे, तो तुम्ही व्यवस्थित नाही करू शकत. हे मोदी करूच शकत नाही. कारण, मोदी जे अमेरिका आणि इस्रायल सांगणार तेच करणार. मोदी शेतकरी, सामान्य लोकांच्या हिताचं करणार नाहीत, जे अमेरिका आणि इस्रायल सांगणार तेच करणार.”