Rahul Gandhi dares PM Modi: माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या आत्मचरित्रामधील काही उतारे राहुल गांधींनी वाचून दाखवल्यामुळे लोकसभेत गोंधळ उडाला. आज पुन्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकावरून पंतप्रधान मोदींना डिवचले. पुस्तकातील उताऱ्यांमुळे काँग्रेस खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केली आणि अध्यक्षांच्या खुर्चीकडे कागदाचे तुकडे भिरकवल्यामुळे आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आज राहुल गांधींनी या पुस्तकाची प्रत संसदेच्या आवारात आणली आणि पंतप्रधान मोदींमध्ये लोकसभेत येण्याची हिंमत नाही, असे आव्हान दिले.
बुधवारी संसद परिसरात राहुल गांधी यांनी आपल्या हातात नरवणे यांच्या आत्मचरित्राची प्रत आणली होती. ते म्हणाले, “हे पुस्तक विदेशात उपलब्ध आहे. मात्र आपले सरकार हे पुस्तक भारतात प्रकाशित होऊ देत नाही.” यानंतर पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत ते म्हणाले, “मला वाटत नाही की, पंतप्रधानांमध्ये आज लोकसभेत येण्याची हिंमत आहे. कारण जर ते आले तर मी त्यांना हे पुस्तक देईन. जेणेकरून ते वाचू शकतील आणि देशाला सत्य कळू शकेल.”
जनरल नरवणे यांनी आत्मचरित्रात त्यांच्या ४० वर्षांच्या लष्करी सेवेचा अनुभव मांडला आहे. ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. जानेवारी २०२४ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. मात्र, त्यातील दोन प्रमुख विषयांवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. डिसेंबर २०२३ मध्ये पीटीआय वृत्तसंस्थेने त्यातील काही उतारे प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय लष्कराने या पुस्तकाची तपासणी (रिव्ह्यू) सुरू केली. या उताऱ्यांमध्ये २०२० साली भारत व चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख होता.
राहुल गांधी पुढे म्हणाले, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे हे पुस्तक प्रत्येक भारतीय तरूणाने वाचले पाहिजे. यात लडाखच्या प्रसंगाचे संपूर्ण दाखले देण्यात आले आहेत. मला सांगितले गेले की, या पुस्तकातला मजकूर उद्धृत करायचा नाही. पण मी या पुस्तकातील पंतप्रधान मोदींची ओळ सांगेल. ते म्हणाले, “जो उचित समझो, वो करो.”

