स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारूनही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी सहारनपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सहारनपूरच्या शब्बीरपूर गावात उसळलेल्या जातीय हिंसाचारात एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सहारनपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी सहारनपूर परिसरात ठाण मांडून आहेत. या ठिकाणची परिस्थिती पुन्हा बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून राहुल गांधी यांच्या दौऱ्याला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, काँग्रेसचे स्थानिक नेते शशी वाली यांनी राहुल यांच्या दौऱ्याला परवानगी देण्याची मागणी लावून धरली होती. जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी राहुल गांधी सहारनपूरमध्ये येणारच, अशी घोषणाही काल त्यांनी केली होती. त्यानुसार सकाळीच राहुल गांधी दिल्लीहून सहारनपूरच्या दिशेने रवाना झाले. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हेदेखील राहुल गांधी यांच्याबरोबर असल्याचे समजते. त्यामुळे आता राहुल गांधी सहारनपूरमध्ये दाखल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन काय पावले उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंसाचाराच्या घटनेला मायावती जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर बहुजन समाज पक्षानेही पलटवार केला आहे. जातीय हिंसाचार आणि त्यात झालेल्या जीवित आणि वित्तहानीला भाजप जबाबदार आहे, असा आरोप पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीयवादी विचार सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला होता.

हल्ले न थांबल्यास धर्मत्याग करावा लागेल, यूपीतील दलितांचा योगी आदित्यनाथांना इशारा

हिंसाचाराच्या घटनेची पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहारनपूर परिसरात ठाण मांडले आहे. दुसरीकडे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवले आहे.

सहारनपूर हिंसाचाराला भाजप, आरएसएस जबाबदार; मायावतींचा गंभीर आरोप