Delhi Building Collapse Breaking : दिल्लीमधील सत्य निकेतन परिसरात एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ही इमारत कोसळल्यानंतर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

एनडीआरएफ (NDRF), दिल्ली अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्यासाठी अग्निशामक दलाच्या किमान आठ गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या असून ही इमारत एक वसतिगृह असून तिथे विद्यार्थी भाड्याने राहत होते.

या घटनेवर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत ‘ही घटना अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक असून विद्यार्थ्यांना अमानवीय परिस्थितीत राहण्यास भाग पाडलं गेलं’, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत सविस्तर भाष्य केलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील सत्य निकेतन या ठिकाणी इमारत कोसळल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांसह अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मी एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल आणि सर्व बचाव पथकांना आवाहन करतो की, त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, जखमींना त्वरित उपचार मिळतील याची खात्री करावी. जेणेकरून बचाव कार्यात कोणतीही कसर राहणार नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेस आणि एनएसयूआयचे (NSUI) कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित असून सर्वतोपरी मदत करत आहेत. या कठीण काळात आम्ही पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. विद्यार्थ्यांचं जीवन आधीच संघर्षांनी भरलेलं आहे. आता तर परिस्थिती आणखी जीवघेणी बनली आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये वसतिगृहांच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ‘पेइंग-गेस्ट’ (PG) म्हणून अत्यंत अमानवीय परिस्थितीत राहावं लागत आहे. जिथे एकाच छताखाली तब्बल ४० जण एकत्र राहत होते. प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य मौल्यवान आहे आणि त्याचं कोणत्याही परिस्थितीत रक्षण केलंच पाहिजे”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नेमकी घटना काय घडली?

दिल्लीमधील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक पाच मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारत कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके देखील घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही पाच मजली इमारत ‘पेईंग गेस्ट’ निवासस्थान म्हणून वापरली जात होती. इमारत कोसळण्याच्या कारणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.