लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी विविध विषयांवर संवाद साधला. राहुल गांधींना जेन झेड विद्यार्थिनींनी महिलांचे हक्क, महिला आरक्षण, महिलांचे अधिकार, मणिपूरचा प्रश्न या सगळ्याबाबत प्रश्न विचारले आणि राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरंही दिली. राहुल गांधी यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Gen Z विद्यार्थिनी, विद्यार्थी हे आपलं भवितव्य आहेत, त्यांचे विचार हे अतिशय स्पष्ट आणि थेट आहेत असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
महिला आरक्षणाबाबतचा प्रश्न आणि राहुल गांधींचं उत्तर
राहुल गांधींशी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी जेव्हा चर्चा केली तेव्हा साहजिकच त्यांनी प्रश्न विचारला तो महिला आरक्षणाच्या विधेयकाचा. विरोधक हे महिला आरक्षण विरोधी आहेत का? तसंच महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं याबाबत तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, हे खरं आहे पण आमचा पक्ष हे कमी प्रमाणात करतो. माझ्यासाठी महिला म्हणजे शिव आणि शक्तीचं स्वरुप आहे. महिला असो की पुरुष या दोघांनाची समानता महत्त्वाची आहे यावर माझा विश्वास आहे. तसंच मला हे वाटतं की महिलांची शक्ती ही पुरुषांपेक्षा अधिक परिणामकारक आहे. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत काम करण्याची क्षमताही अधिक आहे हे माझं मत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच महिला आरक्षण विधेयकावरच्या प्रश्नावर उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, महिला सशक्तीकरणाचं सर्वात जास्त काम कुणी केलं असेल तर ते पंचायत राजने केलं आहे हे नाकारता येणार नाही. त्यावर या विद्यार्थिनी म्हणाल्या की महिला सरपंचांचं काम त्यांचे पती पाहतात. त्यावर लगेचच राहुल गांधी म्हणाले की तुम्ही एखादी चांगली गोष्ट केलीत तरीही त्यातून पळवाटा शोधल्या जातातच. पंचायत राजमुळे महिलांना जितका फायदा झाला आहे तितका राजकीय फायदा इतर कुठल्याही गोष्टीमुळे झाला नाही हे मान्य करावं लागेल. शिवाय पंचायत राज हे आम्ही सुरु केलं आहे असंही राहुल गांधींनी सांगितलं.

महिला आरक्षण बिलावर विद्यार्थिनी काय म्हणाल्या?
१) महिला आरक्षण विधेयकाला फक्त महिला सशक्तीकरणाचा हेतू असं पाहून चालणार नाही. त्यांना समान अधिकारही मिळालेच पाहिजेत.
२) केंद्राने आणलेलं विधेयक हे महिलांना ताकद देण्यापेक्षा डिलिमिटेशन च्या आधारे सत्ता समीकरण बदलण्याची पद्धत म्हणून जास्त समोर येतं आहे असं वाटतं.
३) केंद्र सरकारने असे काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा महिलांबाबत त्यांच्या सक्षमीकरणाबाबत सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत.
४) देशातली पितृसत्ताक पद्धती संपली पाहिजे, हिंसा आणि तिरस्कार संपायला मदत होईल.
५) या विद्यार्थिनी असंही म्हणाल्या की आमच्या दृष्टीने राजकारण म्हणजे समाजाची विभागणी नाही, तर समाजात समानता आणि सन्मान स्थापित करणं आहे.

राहुल गांधींकडून विद्यार्थिनींचं कौतुक
राहुल गांधी म्हणाले मी जेव्हा या विद्यार्थिनींशी चर्चा केली तेव्हा मला हे समजलं की या विद्यार्थिनी उद्याच्या सक्षम महिला आहेत. या सगळ्यांना नुसती आश्वासनं नको आहेत, सुरक्षा हवी आहे, बरोबरीने मिळणारी संधी आणि स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने राबवणारं सरकार हवं आहे. मी जेव्हा या मुलींशी बोललो तेव्हा या सगळ्यांनीच त्यांचं म्हणणं हे अतिशय निर्भिडपणे मांडलं ही बाब मला खरंच कौतुकाची आणि अभिमानाची वाटते. या संपूर्ण मुलाखती दरम्यान राहुल गांधी आणि गार्गी महाविद्यालयाच्या मुलींची अनऔपचारिक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विविध मुद्द्यांवरचे प्रश्न या मुलींनी राहुल गांधींना विचारले आणि राहुल गांधींनी त्यांना उत्तरंही दिली.
Gen Z विद्यार्थिनी आपल्या देशाचं भवितव्य-राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले Gen Z विद्यार्थिनी आपल्या देशाचं भवितव्य आहेत. आम्ही त्यांच्यासाठी संधीचं प्रत्येक दार उघडायला तयार आहोत. या चर्चेदरम्यान विद्यार्थिनींनी हे देखील सांगितलं की गार्गी महाविद्यालयात अभाविपचे समर्थक कसे घुसले होते आणि त्यांनी महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये कसा मुलींना आणि मुलांना त्रास दिला. तरीही पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते, कुणीही त्यात लक्ष घातलं नाही. राहुल गांधी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आणि ते म्हणाले अशा अप्रिय घटना या महाविद्यालयातलं वातावरण खराब करत आहेत, अशा गोष्टी घडणं योग्य नाही. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी या गार्गी महाविद्यालयातील मुलींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
