पीटीआय, नवी दिल्ली

बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिल्यास सशक्तीकरण आशेचे प्रतीक मानणार्‍या लाखो लोकांच्या आकांक्षांचा सन्मान होईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

कांशीराम यांनी भारतातल्या राजकारणाचे स्वरूप बदलवले. चळवळींमधून बहुजन आणि गरिबांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांच्यामुळे अनेकांनी सार्वजनिक जीवनात काम केले. न्याय आणि समतेसाठी राजकारण हा मार्ग असू शकतो, याची जाणीव त्यांच्यामुळे निर्माण झाली, असे गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद आहे.

‘समाजातील सर्वात खालच्या स्तरावरील लोकांसाठी कांशीराम यांनी आयुष्य समर्पित केले. त्यामुळे भारतीय लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत झाली आणि आपली राजकीय व्यवस्था अधिक प्रातिनिधिक व न्याय्य झाली,’ असे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल पत्रात नमूद केले.

काँग्रेसची चूक टाळण्याचे आवाहन

बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही कांशीराम यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. या पुरस्काराच्या बाबतीत काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत जी चूक केली होती, ती चूक केंद्र सरकारने पुन्हा करू नये, असे आवाहन मायावती यांनी केले. कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त जारी केलेल्या एका निवेदनात मायावती यांनी समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि भाजपवर टीका केली. हे सर्व पक्ष बहुजनांबद्दल बोलतात, परंतु त्यांच्या उत्थानासाठी क्वचितच काही काम करतात, असे त्या म्हणाल्या.