Rahul Gandhi On NEET : नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणावरून सध्या देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. नीटच्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे हजारो विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करून आता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द झालेली नीटची परीक्षा आता २१ जून रोजी पुन्हा होणार आहे.

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक संशयितांना सीबीआयने अटक केलं असून पुढील कारवाई सुरू आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्वीटर) एक व्हिडीओ शेअर करत ‘नीट’ पेपरफुटीच्या प्रकरणावर भाष्य करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी केली. राहुल गांधी म्हणाले की, “नीटची परीक्षा देणाऱ्या २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे. तरीही पंतप्रधान मोदी याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून तात्काळ हटवा, नाही तर स्वतः तरी जबाबदारी घ्या”, अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

“२२ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षे रात्रंदिवस मेहनत घेतली. मात्र, ‘नीट’ पेपरफुटीमुळे त्यांची मेहनत वायाला गेली. संपूर्ण देशाला माहीत आहे की परीक्षेच्या दोन दिवस आधी नीटचा पेपर व्हॉट्सॲपवर फिरत होता”, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.