वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेचा पेपर फुटल्याने देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पेपरफुटीच्या गैरव्यवहारानंतर ही परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून, पुढील महिन्यात ती पुन्हा घेतली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“वारंवार पेपर फुटत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी या गंभीर विषयावर गप्प का आहेत?” असा थेट सवाल करत राहुल गांधींनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘२०२४ चीच पुनरावृत्ती, बदललं काहीच नाही!’

राहुल गांधी यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवरून केंद्र सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. २०२४ मधील ‘नीट’ परीक्षेचा गोंधळ आणि यंदाची परिस्थिती यांची तुलना करत त्यांनी सरकारचा एक ठराविक पॅटर्नच समोर आणला आहे.

राहुल गांधींनी लिहिले की, “NEET २०२४: पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली नाही. मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सीबीआय (CBI) चौकशी सुरू झाली. एक समिती स्थापन करण्यात आली., NEET २०२६: पुन्हा पेपर फुटला. परीक्षा रद्द झाली. मंत्री अजूनही पदावरच आहेत, त्यांनी राजीनामा दिलेला नाही. पुन्हा सीबीआय चौकशी सुरू झाली आहे आणि आता आणखी एक नवी समिती स्थापन केली जाईल.””शिक्षणमंत्र्यांना तात्काळ पदावरून हटवा,” अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

सीबीआय चौकशी सुरू, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

दुसरीकडे, ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. सीबीआयने या प्रकरणी विविध राज्यांतून अनेक संशयितांना अटक केली असून, या रॅकेटची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपात आणि गोंधळात लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक मात्र होरपळून निघत आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढला असून, परीक्षा पद्धतीच्या विश्वासार्हतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.