लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (२९ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या कथित ‘शुद्धीकरण’ विधीचा मुद्दा मांडत जोरदार टीका केली आहे.
मल्लिकार्जुन खरगेंची काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये एक सभा पार पडली होती. मात्र, त्यांच्या सभेनंतर काही व्यक्तींनी कथित ‘व्यासपीठ शुद्धीकरण’ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. याच मुद्यावरून पावसाळी अधिवेशनातही मोठा गदारोळ झाला होता. यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: केंद्र सरकारला सवाल केले होते. आता या व्यासपीठ शुद्धीकरणाच्या मुद्यांवरून राहुल गांधी हे आक्रमक झाले आहेत.
मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेनंतर कथित व्यासपीठ शुद्धीकरण केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि मल्लिकार्जुन खरगे यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी प्रोजेक्टरवर काही व्हिडीओ देखील दाखवले आहेत.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं?
“देशात दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरू आहे. एका बाजूला भारताचं संविधान आहे. आंबेडकर, गांधी, जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्या बाजूला भाजपा व आरएसएसची विचारसरणी आहे. सध्या भारतात सुरू असलेलं राजकारण या दोन विचारसरणींमधील आहे. शेकडो वर्षांपासून या देशातील दलितांवर अत्याचार आणि हिंसाचार होत आहे. संविधानाने या गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या असल्या तरी आजही शाळांमध्ये दलित मुलांना शौचालये साफ करायला लावले जातात किंवा फरशी झाडून-पुसून स्वच्छ करायला लावली जाते. मग याचा भावी पिढीच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार करा”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“मुलांना त्यांचे काही सहकारी झाडू मारताना दिसतात, तर झाडू मारणाऱ्या मुलांना असं दिसतं की इतर काही मुलांना हे काम करावं लागत नाही. हेच भारताचं वास्तव आहे. दलितांना गावातील विहिरीवरून पाणी पिण्याची परवानगी नाही, त्यांना स्वतःच्या खासगी विहिरी खोदाव्या लागल्या आहेत. आता चहाच्या टपरीवर तुम्हाला दोन प्रकारचे कप वापरताना दिसून येतात. एक म्हणजे पुन्हा वापरता येण्याजोगा काचेचा कप जो धुता येतो. दुसरा कागदी किंवा प्लास्टिकचा कप जो वापरानंतर फेकून दिला जातो. प्लास्टिक किंवा कागदी कप दलितांसाठी असतात, तर काचेचे कप इतरांसाठी असतात. हेच भारताचं वास्तव आहे. हे उत्तर प्रदेशचं वास्तव आहे. उत्तर भारताचं वास्तव असून हे तुम्हाला अनेक शहरांत किंवा गावांमध्येही पाहायला मिळेल”, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले आहेत.
शुद्धीकरणाच्या वादावर राहुल गांधी काय म्हणाले?
“आम्ही ठरवलं आहे की आमच्या अध्यक्षांना न्याय मिळाला पाहिजे. आता निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांनी योग्य ती कारवाई केली तर उत्तम. पण जर त्यांनी कारवाई केली नाही, तर आमच्याकडून नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते”, असं राहुल गांधींनी म्हटलं.
“पंतप्रधान मोदी हे ना काही बोलत आहेत, ना काही कृती करत आहेत. ही बाब त्यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. त्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. भाजपाच्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्षांनी या कृत्याचे समर्थन करून बेकायदेशीर काम केलं आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. हा अगदी साधा विषय आहे. यावर पंतप्रधान मोदींनी बोलावं की नाही यात आम्हाला रस नाही. तुम्ही अस्पृश्यता पाळत आहात की नाही? या देशात अस्पृश्यता पाळू देत आहात का? हो, मग हा गुन्हा आहे. त्यामुळे आम्हाला यावर कारवाई हवी आहे”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“हा केवळ मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रश्न नाही. हा भारतातील प्रत्येक दलित व्यक्तीचा प्रश्न आहे. आम्ही हा मुद्दा येथे उपस्थित केला. पण ही केवळ हिमनगाची एक छोटीशी बाजू आहे. जर आमच्या अध्यक्षांबरोबर असं घडवून आणलं जाऊ शकतं तर मग शाळेतील एखाद्या चार वर्षांच्या मुलाबरोबर काय घडत असेल? याची कल्पना करा. त्यामुळे, आम्ही आमच्या अध्यक्षांसाठी हा मुद्दा तर मांडतच आहोत. पण त्याचबरोबर भारतातील प्रत्येक दलित व्यक्तीसाठी आणि प्रत्येक महिलेसाठीही हा मुद्दा मांडत आहोत. हे आम्हाला मान्य नाही. ही त्यांची विचारधारा आहे आणि आमचा लढा त्या विचारधारेविरुद्ध आहे”, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
