Rahul Gandhi Comment On Modi, RSS: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रायबरेली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा देखील आक्रमक झाली आहे. “पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरएसएस गद्दार आहेत, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगा”, असे आवाहन राहुल गांधींनी रायबरेलीत कार्यकर्त्यांना केले. राहुल गांधींची भाषा पाकिस्तान आणि दहशतवाद्यांसारखी असल्याची टीका भाजपाने केली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशात रायबरेली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आरएसएसचा संदर्भ देऊन केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे.
तुमचे पंतप्रधान, गृहमंत्री, RSS देशद्रोही – राहुल गांधी
“घरी गेल्यानंतर तुमच्याकडे आरएसएसचे कार्यकर्ते येतील, तेव्हा ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलतील. तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगा की, ‘तुमचे पंतप्रधान देशद्रोही आहेत, तुमचे गृहमंत्री गद्दार आहेत आणि तुमची संघटनाही देशद्रोही आहे. तुम्ही भारताचा सौदा करण्याचे काम केले. तुम्ही आपल्या संस्था, आपले संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावर हल्ले केले आहेत,” असे राहुल गांधी यांना कार्यकर्त्यांना संबोधित करताना आवाहन केले.
भाजपाची टीका
राहुल गांधी यांच्या आरएसएस आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला. राहुल गांधींना देशात अराजकता माजवायची आहे, ते भारतीय व्यवस्थेविरुद्ध लढत आहेत, असा आरोप भाजपाने केला. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. “राहुल गांधींची भाषा एखाद्या शत्रू राष्ट्रासारखी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची जगाला माहीत आहे, त्यासाठी राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. राहुल गांधींना देशात अशांतता हवी आहे, पण देशातील जनता आणि तरुण पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”, असे गिरीराज सिंह म्हणाले.
प्रदीप भंडारीकडून आरोप
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी देखील राहुल गांधींवर टीका करताना राहुल गांधींचे हे वक्तव्य लोकशाहीचा अपमान असल्याचे मत मांडले. “राहुल गांधी एक प्रकारे १४० कोटी भारतीयांना देशद्रोही म्हणत आहेत. त्यांची भाषा पाकिस्तान आणि पाकिस्तानातून चालणाऱ्या दहशतवाद्यांसारखी आहे. राहुल गांधींचा हेतू एका राजकीय विरोधकाचा नसून, भारतीय राजसत्तेविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तीसारखा आहे,” असा आरोप भंडारी यांनी केला.
नितीन नबीन यांच्याकडूनही टीका
“ज्यांनी दहशतवादाला आळा घातला आणि नक्षलवाद समूळ नष्ट केला ते गद्दार आहेत? की ज्यांनी दहशतवादाला आश्रय दिला आणि नक्षलवादाला प्रोत्साहन दिले ते गद्दार आहेत? या देशातील जनता पाहत आहे, त्यांना सर्व काही माहित आहे आणि वेळ आल्यावर ते तुम्हाला उत्तर देतील”, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन म्हणाले.
अनुराग ठाकूर यांची टीका
“अशी अपमानास्पद भाषा वापरणे काँग्रेसचा जुनाच पॅटर्न आहे. १९६५ चे युद्ध असो किंवा आणीबाणीचा काळ, आरएसएसने नेहमीच देशाला पुढे नेण्याचे काम केले. ईव्हीएम असो की निवडणूक आयोग, पंतप्रधान मोदींना शिव्या देणे आणि आरएसएसचा अपमान करणे काँग्रेसचा रोजचा धंदा झालाय,” अशी टीका खासदार अनुराग ठाकूर यांनी केली.
मोदींच्या इटली दौऱ्यावर टीका
सध्या इटली दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबर एक व्हिडीओ समोर आल्यानंतर देखील राहुल गांधींनी टीका केली.
देशात आर्थिक संकट घोंगावत आहे आणि आमचे पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट वाटण्यात व्यस्त आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली. “शेतकरी, तरुण, महिला, मजूर सर्वच रडत आहेत, पण पंतप्रधान हसत आहेत आणि रील्स बनवत आहेत, तर भाजपचे लोक टाळ्या वाजवत आहेत. हे नेतृत्व नसून एक थट्टा आहे,” अशी टीका राहुल गांधींनी केली.
