नवी दिल्ली : ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारीही चौकशी केली. सोनिया यांची ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशी सुरू असताना काँग्रेसने संसद भवनाशेजारच्या विजय चौकात ठिय्या आंदोलन केले. या शक्तिप्रदर्शनादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सायंकाळी त्यांची सुटका केली़

राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, संसद भवन अशा सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात राजपथावर असलेल्या विजय चौकात काँग्रेसचे नेते, संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. ‘ईडी’च्या चौकशीविरोधात सोनिया गांधी यांना पाठिंबा देण्याबरोबरच  काँग्रेसच्या नेत्यांनी इंधन दरवाढ, महागाई, जीएसटी, बेरोजगारी या मुद्दय़ांवर संसदेमध्ये चर्चा होत नसल्याचा आरोप करत केंद्र सरकारविरोधी निदर्शने केली. राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विजय चौकाप्रमाणे काँग्रेसच्या मुख्यालयात जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यानंतर त्यांनीही पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात संघर्ष उडाला़

सोनिया गांधी यांना ‘ईडी’च्या कार्यालयात पोहोचवून राहुल गांधीही काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले. सर्व नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर विजय चौकात एकटे राहुल गांधी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यांच्याभोवती पोलिसांचा गराडा होता. सुमारे ३०-३५ मिनिटांनंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, सचिन पायलट, मनीष तिवारी यांच्यासह लोकसभेतील तसेच, राज्यसभेतील ५० काँग्रेस खासदार आणि राहुल गांधी यांना किंग्जवे कॅम्प पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्यांनी ‘चर्चासत्र’ भरवून देशाच्या सुरक्षेपासून महागाईपर्यंत अनेक विषयांवर चर्चा केली. दरम्यान, काँग्रेसने राहुल यांच्या ठिय्या आंदोलनाची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी करणारे छायाचित्र ट्वीट करून इतिहासाची पुनरावृती होत असल्याचा दावा केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी राजघाटावरही जाऊ दिले गेले नाही, असा आरोप महासचिव अजय माकन यांनी केला. त्यावर, काँग्रेसचा ‘सत्याग्रह’ हे निव्वळ नाटक असून, काँग्रेसकडे आता मुद्दे राहिलेले नसल्याची टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी २१ जुलै रोजी सोनिया यांची ‘ईडी’कडून अडीच तास चौकशी झाली होती. मंगळवारीही सोनियांची सहा तास चौकशी करण्यात आली. त्यांना आज, बुधवारीही चौकशीसाठी बोलावण्यात आले आह़े  याआधी याच प्रकरणात राहुल गांधी यांची ‘ईडी’ने पाच दिवस सुमारे ५० तास चौकशी केली होती़

महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजनांबाबत आवाज उठविणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे ‘राजा’चे आदेश आहेत़  देशात आता जनतेचा आवाज बुलंद करणे हा गुन्हा ठरला आह़े  मात्र, तुम्ही आमचा आवाज दडपू शकत नाही. – राहुल गांधी, काँग्रेस नेते