अमेरिका-इराण युद्ध अद्यापही पूर्णपणे संपलेलं नाही. या युद्धामुळे पश्चिम आशियातील तणाव कायम असल्यामुळे याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम भारताला देखील सहन करावे लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीचं आवाहन केलं होतं. इंधनाची बचत करणं आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील तणावामुळे आर्थिक संकटाबाबत बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आर्थिक संकटाबाबत राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘देशात भयंकर आर्थिक त्सुनामी येणार आहे’, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच एका वर्षभरानंतर मोदी पंतप्रधान नसतील असा मोठा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं?
“देशावर भयंकर आर्थिक त्सुनामी येणार आहे. एवढं मोठं आर्थिक संकट येणार आहे की तुम्ही ते कधीही पाहिलं नसेल. देशातील परिस्थिती बदलत आहे. अनेक यंत्रणांमध्ये अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र आहे. लोकांच्या विरोधामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते”, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.
‘वर्षभरानंतर मोदी पंतप्रधान नसतील’ : राहुल गांधी
एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील”, असा दावा राहुल गांधी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात आणि देशात आर्थिक त्सुनामी येणार असल्याच्या दाव्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसला सुनावलं आहे.
भाजपाने काँग्रेसला सुनावलं
राहुल गांधी यांनी देशात आर्थिक त्सुनामी येणार असल्याचा दावा केल्यानंतर भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधी हे देशात भीती पसरवत असल्याचा आरोप केला आहे.
अमित मालवीय म्हणाले की, “भारत ‘आर्थिक त्सुनामी’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचा राहुल गांधींचा दावा फक्त चुकीचाच नाही, तर तो निव्वळ भीती पसरवण्याचा प्रयत्न आहे. जर आर्थिक सुरक्षा उपाय यंत्रणा खरोखरच काढून टाकली असती, तर कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, पश्चिम आशियातील संघर्ष, पुरवठा साखळीतील व्यत्यय, जागतिक वित्तीय धोरण आणि सततची भू-राजकीय अनिश्चितता असूनही अर्थव्यवस्था सुरळीत का आहे?भारत एका बाह्य धक्क्याचा सामना करत आहे, पण भारत असहाय्य नाही. आर्थिक सुरक्षा उपाय काढून टाकण्यात आलेले नाहीत, उलट गेल्या दशकात ते अधिक मजबूत करण्यात आले आहेत”, अशा शब्दांत अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
इंडिया आघाडीत फूट? काँग्रेसला धक्का
तमिळनाडूमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला काँग्रेसने पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेसने डीएमके बरोबरची युती तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने डीएमके काँग्रेसवर नाराज झाल्याचं बोललं जात होतं. आता काँग्रेस आणि डीएमकेमधील नाराजी उघडपणे दिसून येत आहे. नवी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बैठकीपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाने ८ जूनच्या बैठकीचं निमंत्रण मिळूनही या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
डीएमके पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलं की, “लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राज्यांच्या अधिकारांसाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या मुद्द्यांना डीएमके पक्षाने सातत्याने विरोध केला. यामध्ये नीट परीक्षा, मतदारसंघ पुनर्रचना, निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी, निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आवाज उठवणं, एक राष्ट्र, एक निवडणूक प्रस्ताव आणि वक्फ कायदा व परकीय योगदान नियमन कायद्यातील (FCRA) दुरुस्त्या यासह आदी मुद्यांचा समावेश आहे.”
“इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून डीएमके पक्ष कायम आघाडीबरोबर राहिला आहे. तसेच पक्षाध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे. मात्र, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने केलेल्या कथित ‘विश्वासघातामुळे’ डीएमकेचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत काँग्रेस उपस्थित असलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे”, असं डीएमकेने निवेदनात म्हटलं.
