केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांकडून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. इंडिया आघाडीच्यावतीने मंगळवारी दिल्लीत मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज (७ ऑक्टोबर) पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी खासदार जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी रवाना झाले आहेत.

त्यामुळे जंतरमंतरवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सध्या जंतरमंतरवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक मोठं वक्तव्य केलं. विरोधी पक्षाच्या खासदारांवर आणि स्वतःवर दाखल झालेल्या एफआयआरबाबत बोलताना राहुल गांधींनी केंद्र सरकारला मोठा इशारा दिला. ‘माझ्यासाठी एफआयआर म्हणजे एक मेडल आहे. त्यामुळे माझ्यावर १०० एफआयआर दाखल झाले तरी चालतील’, असं राहुल गांधी यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

“माझ्याविरुद्ध ४५ एफआयआर दाखल झाले आहेत. आता माझी इच्छा आहे की माझ्याविरुद्ध १०० एफआयआर दाखल व्हावेत. कारण प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एका मेडलसारखा आहे”, असं म्हणत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या निदर्शनांनंतर विरोधी खासदारांवर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आपण आणखी गुन्हे किंवा खटल्यांना सामोरे जाण्यास तयार असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सर्व विरोधी खासदारांचा दिल्लीत ठिय्या

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी दिल्लीत मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने सुरू केले आहेत. सर्व विरोधी खासदार बसेसच्या माध्यमातून जंतरमंतरकडे रवाना झाले आहेत. मात्र, विरोधी खासदारांच्या या बसेस पोलिसांनी रोखल्यामुळे आता राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व विरोधी खासदारांनी दिल्लीत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. त्यामुळे दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, जंतरमंतरच्या दिशेने जात असलेल्या बसच्या छतावर काँग्रेसचे खासदार अमरिंदर सिंग राजा वडिंग, दीपेंद्र सिंग हुड्डा, इम्रान प्रतापगढी आणि इम्रान मसूद चढले होते. यावेळी पोलिसांनी बस रोखल्यानंतर खासदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.