Rahul Gandhi On Bihar Election Resut 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने जोरदार विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे आरजेडीने या निवडणुकीत ३० हून कमी जागा जिंकता आल्या आहेत. तर काँग्रेसला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाहीत. काँग्रेसची कामगिरी या निवडणुकीत अत्यंत सुमार राहिली आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या पराभवानंतर विरोधकांच्या महागठबंधनला मतदान करणाऱ्या बिहारच्या जनतेचे आभार मानले आहे. राहुल गांधी म्हणाले की, “मी बिहारच्या त्या कोट्यवधी मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. आम्ही एका अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याचे आपले प्रयत्न अधिक प्रभावी करतील.
भाजपाला मोठं यश
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठा विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करत २४३ पैकी २०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत .दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा दारूण पराभव झाला आहे. विरोधकांना ४० ही संख्या देखील गाठता आलेली नाही.
आरजेडीने २४ जागा जिंकल्या असून बातमी लिहीपर्यंत पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही. काँग्रेसला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपाने ८७ जगांवर विजय नोंदवला आहे तर दोन जागांवर आघाडी मिळवली आहे. आणि जनता दल युनायटेडने ८० जागांवर विजय मिळवला असून पक्ष ५ जागांवर आघाडीवर आहे.
