लोकसत्ता विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरून पुन्हा राजकारण तापले असून, भाजपने त्यांच्या प्रवासाच्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधींकडे परदेश दौऱ्यांचा हिशोब विचारला. राहुल गांधींनी गेल्या काही वर्षांत ५४ परदेश दौरे केले असून, त्यावर अंदाजे ६० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, त्यांच्या जाहीर उत्पन्नानुसार त्यांची कमाई केवळ ११ कोटी रुपये इतकीच आहे. उत्पन्न ११ कोटी आणि परदेश दौऱ्यांवर खर्च ६० कोटी, मग, परदेश दौऱ्यासाठी पैसा आला कुठून, या खर्चाचा स्रोत काय आहे, असा सवाल पात्रा यांनी केला.

राहुल गांधींनी त्यांच्या परदेश दौऱ्यांचा संपूर्ण तपशील, खर्च आणि निधीचे स्रोत सार्वजनिक करावेत. तसेच, हे दौरे केवळ वैयक्तिक किंवा राजकीय उद्देशांसाठी होते, की त्यामागे इतर कोणी तरी निधी उपलब्ध करून दिला होता, हे स्पष्ट करावे, अशी मागणी पात्रा यांनी केली.

काँग्रेसचे उत्तर काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळले असून हा भाजपचा केवळ “राजकीय स्टंट” असल्याची टीका केली आहे. राहुल गांधींचे अनेक दौरे हे अधिकृत, निमंत्रित कार्यक्रम किंवा शैक्षणिक, व्याख्यान आणि संवाद सत्रांशी संबंधित असतात. प्रत्येक दौऱ्याचा खर्च राहुल गांधी स्वतः करत नाहीत. अनेक वेळा आयोजक संस्था किंवा यजमान खर्च उचलतात, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे महासचिव व माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दिले.