नांदेडमधील निकालास चोवीस तास उलटल्यानंतर अभिनंदन; तेही ‘प्रदेश काँग्रेस’चे  

भाजपला धूळ चारून नांदेड महापालिकेमध्ये माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मिळविलेल्या बलाढय़ यशाचे कौतुक करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना चोवीस तास लागले. त्यांनी अभिनंदन केले; पण प्रदेश काँग्रेसच्या कामगिरीचे. चव्हाण यांचा स्पष्ट उल्लेख त्यांना टाळला.

एकीकडे ग्रामपंचायतींमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जाहीर अभिनंदन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असताना दुसरीकडे मात्र, नांदेडमध्ये गुरूवारी घवघवीत यश मिळवूनही राहुल गांधी यांनी चव्हाणांचे अभिनंदनसुद्धा केले नव्हते. शिवसेनेसह विरोधी पक्षांकडून अभिनंदनाचा वर्षांव होत असताना खुद्द राहुल यांच्या थंडय़ा प्रतिसादाने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या. सामाजिक माध्यमांवर त्याबाबत चर्चा सुरू होती. त्या पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर राहुल यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास ट्विट केले. ‘नांदेडमधील जबरदस्त कामगिरीबद्दल मी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन करतो,’ असे त्यांनी म्हटले आहे. जरी चव्हाण खुद्द प्रदेशाध्यक्ष असले तरी राहुल यांनी नांदेडमधील कामगिरीचे श्रेय व्यक्तिगत पातळीवर थेट चव्हाणांना देण्याचे टाळले. त्यांना चव्हाणांचा उल्लेख केला नाही.

राहुल यांच्या या कृतीबद्दल काँग्रेस वर्तुळात आश्र्च्र्य व्यक्त केले जात होते. पण राहुल यांच्याबाबतीत हा प्रकार नवा नाही. गुजरात राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेले सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे त्यांनी शेवटपर्यंत अभिनंदन केले नाही. किंबहुना विजयाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी २४ तास उशिरा का होईना; अभिनंदन केले, पण चव्हाणांचा स्पष्ट उल्लेख टाळून.