Rahul Gandhi fuel price hike criticism : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांनी वाढ केली. गेल्या आठवड्याभरातील ही दुसरी दरवाढ आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी इंधन दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. एक आर्थिक वादळ येणार आहे, असा सूचक इशाराच त्यांनी दिला आहे. रायबरेलीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, “देशाच्या अर्थव्यवस्थेवर कठीण काळ येत आहे. कार्यवाही करण्याऐवजी पंतप्रधान मोदी लोकांना परदेश दौरे न करण्यास सांगत आहेत. मात्र ते स्वतः परदेश दौऱ्यांना जात आहे.” ते पुढे म्हणाले, मी गेल्या काही दिवसांपासून हेच सांगतोय की मोदींनी आर्थिक रचना बदलली आहे. एक आर्थिक वादळ येणार आहे. त्यांची अदाणी आणि अंबानी रचना जास्त काळ टिकणार नाही. ती कोसळेल. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की याचा फटका सामान्य माणसांना बसणार आहे. या आर्थिक धक्क्याचा परिणाम केवळ अदाणी, अंबानी आणि मोदी यांच्यावरच होणार नसून त्याचा सर्वसामान्य माणसावर खोल परिणाम होणार आहे. हे अभूतपूर्व असेल. कठीण काळ येत आहे.”

आज ९० पैशांनी इंधन दरांत वाढ

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९८.६४ रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर प्रति लिटर ९१.५८ रुपये झाले आहेत. मूल्यावर्धित करातील फरकामुळे राज्यातील दरांमध्ये तफावत असू शकते. इंधनाचे दर आता मे २०२२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.