Rahul Gandhi : लोकसभेत मागचे तीन दिवस जोरदार हंगामा पाहण्यास मिळाला. दरम्यान आज राज्यसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेसने संविधान, राष्ट्रपती आणि शिखांचा अपमान केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान राहुल गांधींनी एक पोस्ट लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींबाबत काय म्हणाले?

पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले, काँग्रेसच्या तल्लख डोक्याचे युवराज असलेल्या माननीय खासदारांनी (राहुल गांधी) केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना गद्दार असं म्हटलं. युवराजांचा अहंकार किती पराकोटीला पोहचला आहे जरा बघा. काँग्रेस सोडून आत्तापर्यंत अनेक लोकांनी विविध पक्षांमध्ये जाणं पसंत केलं आहे. मात्र कुणालाही हे बोलले नाहीत. रवनीत सिंह बिट्टू शिख आहेत, त्यांना गद्दार म्हणणं हा शिखांचा अपमान आहे. शिखांच्या मनात काँग्रेसच्या युवराजांच्या मनात जो तिरस्कार आहे तोच पाहण्यास मिळाला. म्हणूनच असे शब्द त्यांनी वापरले असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. दरम्यान राहुल गांधींनी एक पोस्ट लिहित मोदींना उत्तर दिलं.

काय आहे राहुल गांधींची पोस्ट?

बस सवालों से इतनी घबराहट?
मोदी जी सच्चाई से ऐसा डरे,
झूठ की शरण ले ली।
खैर, जो उचित समझा, वही किया।

“फक्त प्रश्नांची इतकी भीती, मोदीजी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला,असुद्यात जे योग्य वाटलं, ते केलं” राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. शिवाय ही पोस्ट राहुल गांधींनी त्यांच्या अधिकृत पेजवर पिन करुन ठेवली आहे.

काँग्रेसवर टोलेबाजी करत पंतप्रधान मोदींनी केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की, काँग्रेसनं स्टार्टअप संस्कृतीला प्रमोट केलं नाही. त्यांची परिस्थिती अशी आहे की आपल्या घरचं स्टार्टअप ठीक करु शकत नाहीत. काँग्रेस हताश आहे, त्यांना मोदींची कबर खोदायची आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केली. आम्ही ३७० ची भिंत पाडली.ईशान्य भारताला विकासाच्या मार्गावर आणलं. पाकिस्तानी दहशतवाद्यांना घरात घुसून उत्तर देतो, ऑपरेशन सिंदूर करतो. माओवाद्यांच्या आतंकापासून देशाला मुक्ती देण्यासाठी धाडसी पाऊल उचलतो, यामुळं त्यांना मोदीची कबर खोदायची आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दरम्यान आता राहुल गांधींनी चार ओळींची पोस्ट लिहून जे योग्य वाटलं तेच केलं असं म्हणत उत्तर दिलं आहे. दरम्यान राहुल गांधींच्या या पोस्टवर प्रतिक्रिया येत आहेत.