काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा आज (१९ जून) ५४ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने देशभरातून राहुल गांधींना शुभेच्छा येत आहेत. आज सकाळी काँग्रेस कार्यालयात जाऊन त्यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थतीत प्रियांका गांधींसह केक कापला. यावेळी कार्यालयाबाहेर समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

राहुल गांधी यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून त्यांना यश मिळालं. त्यांनी वायनाडची जागा सोडली असून या ठिकाणाहून आता प्रियंका गांधी निवडणूक लढवणार करणार आहेत. दरम्यान, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त इंडियन युवा काँग्रेसने अनोख उपक्रम राबवला. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसतर्फे कूलर वाटण्यात आले. शहरातील निवारागृहातील नागरिकांसाठी ही योजना होती.

सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत वातावरण सातत्याने बदलतंय. उन-वारा-पावसाचं संमिश्र वातावरण असल्याने येथे उष्णताही वाढली आहे. परिणामी लोकांना उष्म्यातच दिवस काढावा लागतो. त्यामुळे या निमित्ताने काँग्रेसने निवाराकेंद्रात मोफत कुलर दिले आहेत.

हेही वाचा >> प्रियांकांसाठी राहुल गांधींनी वायनाड का सोडलं? काय आहे कारण?

राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडला

राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना या दोन्ही मतदारसंघात विजय प्राप्त झाला आहे. काल सोमवारी (१७ जून) काँग्रेस पक्षाने अशी घोषणा केली आहे की, राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघ राखतील, तर केरळमधील वायनाड मतदारसंघ सोडून देतील. या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढवतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रियांका गांधी आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.