Rahul Gandhi On Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवला, तर महाआघाडीचा मात्र सुपडा साफ झाला. २४३ पैकी २०० पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळाल्या. निवडणुकीनंतर आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस पक्षाने बिहारमधील ७ बड्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाविरुद्ध कृती करणाऱ्या नेत्यांवर आता काँग्रेसने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल सात मोठ्या नेत्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. तसेच त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द केलं आहे. बिहार काँग्रेस शिस्तपालन समितीने ही कारवाई केली. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

वृत्तानुसार, काँग्रेसची मूलभूत तत्त्वे, शिस्त आणि संघटनात्मक प्रतिष्ठेबाबत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आणि पक्षाच्या विरोधात दिशाभूल करणारी विधाने केल्याप्रकरणी शिस्तपालन समितीचे अध्यक्ष कपिलदेव प्रसाद यादव यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी शिस्तपालन समितीने नमूद केलं की नेत्यांनी सातत्याने पक्षाच्या व्यासपीठाबाहेर काँग्रेसच्या कार्यक्रम आणि निर्णयांविरुद्ध विधाने केली आहेत. एवढंच नाही तर पक्षाच्या नेत्यांच्या सूचनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. सोशल मीडियावरही निराधार आणि दिशाभूल करणारे आरोप करून पक्षाच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान पोहोचवलं.

कोणत्या सात नेत्यांची हकालपट्टी केली?

काँग्रेस सेवा दलाचे माजी उपाध्यक्ष आदित्य पासवान, बीपीसीसीचे माजी उपाध्यक्ष शकीलुर रहमान, किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राज कुमार शर्मा, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राज कुमार राजन, मागास विभागाचे माजी अध्यक्ष कुंदन गुप्ता, बांका जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षा कांचना कुमारी आणि नालंदा जिल्ह्यातील रवी गोल्डन.

भाजपानेही तीन नेत्यांवर केली होती कारवाई

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने देखील मोठी कारवाई करत पक्षातून बड्या नेत्याची हकालपट्टी केली होती. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यासह तीन नेत्यांवर कठोर कारवाई करत त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलेलं आहे. माहितीनुसार, माजी केंद्रीय मंत्र्यांवरील ही कारवाई त्यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि विधानांमुळे करण्यात आली आहे. या कारवाईच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी एनडीएच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप केले होते.