Rahul Gandhi in US: राहुल गांधींचा अमेरिकेत भाजपा व संघावर हल्लाबोल; म्हणाले, “आरएसएसला वाटतंय की…”

Rahul Gandhi in US: राहुल गांधी म्हणाले, “हा लढा निवडणूक काळात मूर्त स्वरुपात आला. तेव्हा लाखो लोकांना स्पष्टपणे दिसलं की देशाचे पंतप्रधान…”

rahul gandhi targets modi in us
राहुल गांधींचं अमेरिकेत मोदींवर टीकास्र (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rahul Gandhi Targets PM Narendra Modi in US: लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते स्थानिक भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधणार आहेत. रविवारी अमेरिकेच्या डलास भागात झालेल्या अशाच एका संवाद कार्यक्रमात राहुल गांधींनी भारतीय राजकारण, लोकसभा निवडणुकांचे परिणाम, भाजपाची पीछेहाट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी यावर भाष्य केलं. तसेच, भारताच्या राज्यघटनेवर हल्ला सहन केला जाणार नाही, या भूमिकेची पुनरावृत्तीही केली.

राहुल गांधींची RSS वर टीका

दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर बोट ठेवलं. “RSS ला वाटतं की भारत ही एक कल्पना आहे. आम्हाला वाटतं की भारत म्हणजे अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. आम्हाला वाटतं प्रत्येकाला सहभाग घेण्याची संधी मिळायला हवी, स्वप्न पाहण्याची संधी मिळायला हवी. जात, धर्म, भाषा, संस्कृती, इतिहास या आधारावर भेदभाव न करता प्रत्येकाला त्याची जागा मिळायला हवी. हा खरा लढा आहे”, असं राहुल गांधींनी नमूद केलं.

“हा लढा निवडणूक काळात मूर्त स्वरुपात आला. तेव्हा लाखो लोकांना स्पष्टपणे दिसलं की देशाचे पंतप्रधान राज्यघटनेवर हल्ला करत आहेत. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय कारण संघराज्य, भाषांचा आदर, धर्मांचा आदर, संस्कृतींचा आदर, जातीचा आदर हे सगळं राज्यघटनेत आहे. यातला प्रत्येक शब्द राज्यघटनेत आहे”, असं म्हणत या सर्वांवर झालेला हल्ला म्हणजे राज्यघटनेवरचा हल्ला असल्याची भूमिका राहुल गांधींनी मांडली.

“लोकांना समजलं की भाजपा राज्यघटनेवर हल्ला करतेय”

“जेव्हा मी राज्यघटना हातात धरतो, तेव्हा लोकांना कळतं मला काय म्हणायचं आहे. लोक म्हणत होते की भाजपा आमची संस्कृती, भाषा, राज्ये, इतिहासावर आक्रमण करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे समजलं की जो कुणी राज्यघटनेवर हल्ला करत असेल तो त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरांवर हल्ला करत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींचा अमेरिकेत टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद! (फोटो – काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून साभार)

“माझ्या संसदेतील पहिल्या भाषणात जेव्हा मी अभय मुद्रा दाखवली, आणि म्हणालो की देशातल्या प्रत्येक धर्मात हात हे अभयाचं प्रतीक आहे तेव्हा भाजपाला हे सहन झालं. त्यांना ते समजलं नाही. आपण त्यांना हे समजावून सांगणार आहोत”, असं सूचक विधानही राहुल गांधींनी केलं.

Rahul Gandhi in US: “कोणत्याही राजकीय नेत्याचं महत्त्वाचं काम म्हणजे…”, राहुल गांधींचा अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद!

“दुसरी एक बाब खूप आश्चर्यकारकरीत्या वेगाने घडली. भाजपाची भीती संपुष्टात आली. आपण पाहिलं की लोकसभा निवडणूक निकालांच्या अगदी काही मिनिटांमध्ये देशात कुणालाही भाजपा किंवा पंतप्रधानांची भीती वाटेनाशी झाली. हे राहुल गांधी किंवा काँग्रेसचं यश नसून भारताच्या लोकांचं यश आहे, ज्यांना हे लक्षात आलंय की ते त्यांच्या राज्यघटनेवर, धर्मावर, स्वातंत्र्यावर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही”, अशा शब्दांत राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul gandhi in dallas usa slams rss bjp pm narendra modi indian diaspora pmw

First published on: 09-09-2024 at 10:55 IST
Show comments