नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसवण्यात आल्याने काँग्रेसने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्याला मागे बसविणे यातून पंतप्रधान मोदी यांना लोकशाही परंपरांचा आदर नसल्याचे दिसून येते, असे काँग्रेसने म्हटले आहे. ‘‘विरोधी पक्षनेत्याचा दर्जा हा कॅबिनेट मंत्र्यासारखा असून सरकारचे मंत्री पहिल्या रांगेत बसतात, मात्र राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवले जाते. यावरून तुम्हाला आणि तुमच्या सरकारला लोकशाही, लोकशाही परंपरा आणि विरोधी पक्षनेत्याचा आदर नसल्याचे दिसून येते, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नेहरूंचे नाव नसल्याबद्दल नाराजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात स्वातंत्र्य चळवळीतील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख नसल्याबद्दल काँग्रेसने गुरुवारी तीव्र आक्षेप घेतला. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना इतिहासातून पुसून टाकण्याच्या सततच्या मोहिमेचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री केलेल्या भाषणाची आठवण करून दिली.