पीटीआय, नवी दिल्ली

केंद्र सरकारविरोधात देशभरात असलेला प्रचंड रोष पाहता, पुढील निवडणुका आपण आधीच जिंकल्या आहेत. पण या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष नसतील, ही मुख्य समस्या आहे, असे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत सांगितले. सोमवारी झालेल्या या बैठकीत राहुल यांनी केलेले भाषण शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले.

यावेळी राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांना ऐक्य राखण्याचे आवाहन केले. आपण एकत्र राहून विरोध केला तर भाजपचा पराभव करणे सहजशक्य आहे, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांमध्ये समन्वय नाही आणि ते एकत्र काम करत नाहीत, ही समजूत चुकीची असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “हा सर्व प्रचार भाजपकडून केला जातो. हे खरे नाही – मला १०० टक्के ऐक्याची खात्री आहे आणि मी याक्षणी द्रमुकचीही खात्री देऊ शकतो.” भारत या संकल्पनेचा बचाव करताना प्रत्येकजण आपल्याबरोबर असेल असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला. द्रमुकने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.

काँग्रेसवर डाव्या पक्षांसारख्या ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांनीही टीका केली आहे, याचा उल्लेख करत राहुल यांनी काँग्रेसला ‘विष प्राशन करणाऱ्या नीलकंठा’ची उपमा दिली.

‘आधी काँग्रेसचे ऐक्य राखा’

‘इंडिया’ आघाडीमध्ये ऐक्य राखण्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका करताना, भाजपने त्यांना आधी आपल्या पक्षाचे ऐक्य टिकवा असा खोचक सल्ला दिला. राहुल यांचे नेतृत्व विरोधकांना मान्य नाही, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला. काँग्रेसचे ‘इंडिया’च्या घटक पक्षांशी संबंध ताणले गेले आहेत, असेही पूनावाला म्हणाले.