नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धार कायम ठेवत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा काढला. जंतर-मंतरच्या दिशेने निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी जनपथ-अशोका रोड चौकात अडवले.

राहुल गांधींसह इतर खासदारांना पोलिसांनी उचलून बसगाडीत डांबले. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या देऊन बसलेल्या प्रियंका गांधी-वढेरा यांनाही ताब्यात घेण्यात आले. ज्ञानेश कुमार हटेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, आम्ही थांबणार नाही, असे राहुल गांधींनी आंदोलनादरम्यान पत्रकारांना सांगितले.

‘इंडिया’आघाडीच्या खासदारांचा जंगी मोर्चा मंगळवारी काढण्यात आला होता. त्यादरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा तसेच, इतर काँग्रेसच्या खासदारांनी आकाशवाणी भवनात साडेआठ तास ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी, बुधवारी पुन्हा राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार रस्त्यावर उतरले. हे पाहता काँग्रेसकडून दररोज आंदोलन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी दुपारी जनपथमधील सागर रत्न या रेस्टारंटमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांसाठी भोजनाचे आयोजन केले होते. या भोजनानंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानंतर, तीन बसमधून खासदार जंतर-मंतरकडे रवाना झाले. मात्र, पोलिसांनी जनपथ आणि अशोका रोडच्या चौकातच बस अडवल्या. बस अडवल्यावर लगेचच राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर खासदारही खाली उतरले व त्यांनी जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यातील अनेक कार्यकर्ते बसगाड्यांच्या टपावर चढले होते. त्यांच्यापैकी काहींनी पोलिसांनी उभ्या केलेल्या बसगाड्यांच्या चाकातील हवाच काढून टाकली. काहींनी बसगाड्यांच्या काचा तोडून बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला. खरगेही आंदोलनात सहभागी झाले होते मात्र, ते काँग्रेस खासदारांच्या बसगाडीतून बाहेर पडले नाहीत. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. जनतेचे अधिकार वाचवण्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी घाबरणार नसल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले.

व्यापक आंदोलनाचा ‘सीजेपी’चा निर्धार

नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक व्यापक करण्याचा निर्धार डाव्या विद्यार्थी संघटना आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) व्यक्त केला. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला तरी आंदोलन थांबणार नसून, निवडणूक व्यवस्थेत व्यापक सुधारणा होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ‘सीजेपी’चे सह-संयोजक सौरव दास यांनी दिला. जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला होणार्‍या आंदोलनामध्ये देशभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केले.