नवी दिल्ली : मतचोरीचा आरोप करत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयावर विराट मोर्चा काढला. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेट देण्यास नकार दिल्यामुळे राहुल गांधींच्या विधि चमूने याचिका दाखल केली. मात्र त्यानिमित्ताने इंडिया आघाडीने केवळ एकजूटच दाखवली नाही तर, आठवडाभरात पाचव्यांदा शक्तिप्रदर्शन करत केंद्र सरकारविरोधातील लढाई आणखी तीव्र केली.

या मोर्चामध्ये इंडिया आघाडीचे कार्यकर्तेच नव्हे तर, विद्यार्थी, जेन-झी तरुण, वकील, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या व्यापकतेमुळे मोर्चाला जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले. इंडिया आघाडीच्या मोर्चामुळे जंतर-मंतर २.०च्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व राहुल गांधींच्या हाती आल्याचे मानले जाऊ लागले आहे.

गेले दोन दिवस डाव्या विद्यार्थी संघटनांचे आंदोलक दिल्लीच्या विविध  भागांमध्ये अवचित निदर्शने (फ्लॅश प्रोटेस्ट) करत आहेत. त्याचे प्रमुख केंद्र कॅनॉट प्लेस राहिले आहे. येथूनच सोमवारी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. कॅनॉट  प्लेस-बाराखंबा रोड जंक्शन ते सर्वोच्च न्यायालय हा दोन किमीचा परिसर कार्यकर्त्यांनी भरून गेला होता.

न्यायालयापासून काही अंतरावर पोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला खरा पण, मंडी हाऊस परिसरामध्ये दीड तास नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. या मोर्चामध्ये काँग्रेसचे तसेच, त्यांच्या विद्यार्थी व युवक संघटना, एनएसयूआय- आयवायसीचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने सहभागी झाले होते.  या मोर्चामुळे सोमवारी जंतर-मंतर २.०च्या आंदोलनाचे स्थळ मंडी हाऊस ते सर्वोच्च न्यायालयाला जोडणार्‍या भगवान दास रस्त्यावर स्थलांतरित झाले.

इंडिया आघाडीतील ऐक्य

इंडिया आघाडीच्या वतीने दोन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, न्यायालयात सनदशीर मार्गाने या, असे कळवत सरन्यायाधीशांनी भेटण्यास नकार दिला. मतचोरीसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत असून तुम्हाला ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल करता येईल. तुम्ही याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात येऊ शकता, असे सरन्यायाधीशांनी कळवले असल्याचा दावा राहुल गांधींनी सोमवारी मोर्चापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.

मोर्चामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव व त्यांचे इतर नेते, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे संजय राऊत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, , भाकपचे महासचिव डी. राजा, माकपचे महासचिव एम. ए. बेबी यांच्यासह काँग्रेसचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. अखिलेश यादव व तेजस्वी यादव तसेच, संजय राऊत हेही सहभागी झाल्याने इंडिया आघाडीतील कथित मतभेदाची चर्चा निकालात निघाली.

ढोलताशावर प्रियंका-सुप्रिया यांचा ठेका बाराखंबा-कॅनॉट प्लेस जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात झाली. पुढे तो मंडी हाऊसच्या दिशेने आणि तेथून भगवानदास रोडमार्गे सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने निघाला. हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कॅनॉट प्लेसपासून मंडी हाऊसपर्यंतचा संपूर्ण पट्टा आंदोलकांनी व्यापला होता. त्याआधी इंडिया आघाडीचे नेते क्स्टिटट्युशन क्लबमध्ये एकत्र जमले आणि तिथून बसगाडीतून एकत्रितपणे बाराखंबा रोडवरील मोर्चात सामील झाले.

राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा, सुप्रिया सुळे, महुआ मोईत्रा आदी सगळे नेते रस्त्यावर उतरले होते. प्रियंका गांधी, नेहा बोरा मोच्र्यामध्ये आघाडीवर होत्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच काही नेत्यांनी बसगाडीतून प्रवास केला. या मोर्चामध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांच्या नेत्या नेहा बोरा, आइशे घोष या देखील सहभागी झाल्या होत्या. गेले दोन दिवस या विद्यार्थी नेत्यांनी आंदोलन करून सळो की पळो करून सोडले होते. सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादवही मोर्चात सहभागी झाले होते.  ‘ज्ञानेश कुमार हटवा’, ‘मतदार यादीतील फेरफार थांबवा’ अशा मागण्यांचे फलकही फडकवले जात होते.  राहुल गांधी यांच्या नावाच्या घोषणा यामुळे परिसर दुमदुमून गेला. ढोलताशांवर प्रियंका गांधी-वाड्रा आणि सुप्रिया सुळे यांनी ताल धरला होता. त्यांना आंदोलकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला.