काँग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) मुंबईतील वर्सोवामध्ये कोळी बांधवांच्या समस्याजाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोळी बांधवांनी आपल्या समस्यांचा पाढाच राहुल गांधींसमोर सुरू केला.   
कोळी बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी राहुल गांधींसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस नेते गुरुदास कामतही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी कोळी बांधवांच्या समस्याजाणून काही आश्वासनेही दिली. मी नेहमी समाजातील कमजोर घटकांच्या बाजूने असल्याचे राहुल गांधींनी यावेळी म्हटले.
कोळी बांधवांना होणाऱया आर्थिक, सामाजिक आणि रोजगाराच्या समस्या कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी यावेळी राहुल गांधींसमोर मांडल्या. सीआरझेडची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल असे आश्वासन राहुल गांधींनी दिले. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोळी बांधवांना लागणाऱया डिझेल संदर्भात अनुदानाबाबत नव्याने विचार करणार असल्याचे म्हटले.
चर्चेला उपस्थित कोळी बांधवांनी आपली पारंपारिक लालटोपी घातली होती. अशी टोपी आपल्यालाही घालण्यात यावी असा राहुल गांधींचा आग्रह उपस्थित कोळी बांधवांनी पूर्ण केला. कोळी बांधवांना राजकीय पाठिंबा नसल्याची तक्रार कोळी प्रतिनिधींनी राहुल गांधींकडे केली. यावर कोळी बांधवांचे एक आमदार किंवा खासदार प्रतिनिधीत्व करु शकतो का? असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी कोळी बांधवांचं प्रतिनिधीत्व विधानसभा, लोकसभेमध्ये उमटायला हवे असेही म्हटले