राहुल गांधींचे विचार हे सनातन विरोधी आहेत आणि त्यांचा तेवढाच अजेंडा आहे असं अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी क्रिती सेनॉनची बाजू घेत जी पोस्ट केली होती त्याबाबत एक प्रश्न कंगना रणौतला विचाऱण्यात आला त्यावर तिने हे उत्तर दिलं आहे. क्रितीने जाहिरात केली त्यातून हिंदू संस्कृती नाहिशी करण्याचाही एक प्रकारे प्रयत्न झाला. मी त्यासाठीच पोस्ट केली होती. मात्र राहुल गांधी यांचा अजेंडा सनातन विरोधी आहे असं म्हणत कंगनाने टीका केली आहे.
अभिनेत्री कंगनाने नेमकं काय म्हटलं आहे?
“क्रिती सेनॉन यांच्याबाबत जर बोलायचं असेल तर मला सांगा त्यांनी ज्या प्रकारचे चित्रपट केले आहेत, जसे कपडे परिधान केले आहेत त्याबद्दल त्यांना कुणी काय म्हटलंय? कुणालाही त्याची काही पडलेली नाही. मी जी पोस्ट केली ती रक्षाबंधन बाबत होती. मला सांगा राहुल गांधी यांच्या पोस्टमध्ये रक्षाबंधन हा शब्द का नाही? त्यांनी असं कुठे म्हटलं आहे की एक महिला रक्षाबंधनच्या दिवशी तिला हवे तसे कपडे घालू शकते. रक्षाबंधन हा धार्मिक विषय आहे. त्याचे काही नियम असतात. राहुल गांधी त्यांच्या विचारांमध्येच किती गोंधळलेले आहेत. तीन वर्षांच्या मुली जेव्हा बुरखा घालतात तेव्हा त्यांना वाटत नाही की पितृसत्ताक पद्धती संपवली पाहिजे. कारण त्यांना हे माहीतही नाही की बुरखा काय असतो. राहुल गांधींची विचारसरणी मर्यादित आहे. सनातनवर हल्ला करणं एवढाच त्यांचा अजेंडा आहे. मी तर त्यांना हाफ ख्रिश्चनही म्हणणार नाही.” असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाने डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.
जाहिरात मागे घेतली ते योग्यच झालं-कंगना
जाहिरात मागे घेतली गेली त्याबाबत काय सांगाल असं विचारलं असता कंगनाने म्हटलंय, “क्रिती सेनॉनन यांनी जी जाहिरात केली त्यातला पोशाख हा एक छोटासा मुद्दा होता. ब्रालेट घातलं ते सोडून द्या. पण संपूर्ण जाहिरातीत आई वडील दिसले का? पूजेची तयारी, गंध, अक्षता, फुलं काही दिसलं का? हलवा-पुरी, दिवा सगळं का दाखवलं नाही? टिळ्याशिवाय राखी कशी चालेल? त्या जाहिरातीमुळे मीच नाही तर संपूर्ण हिंदू समाज दुखावला होता. एक प्रकारे हिंदू संस्कृती पुसण्याचाच प्रयत्न झाला. त्यामुळे कंपनीने जाहिरात मागे घेतली ते बरंच झालं.” असंही कंगनाने म्हटलं आहे.
