पीटीआय, पथनमथिट्टा

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी डावी आघाडी (एलडीएफ) आणि भाजपदरम्यान समझोता झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साेमवारी केली. ते अडूर येथे काँग्रेसच्या सभेत बोलत होते.

राहुल म्हणाले, “एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ म्हणाला होता की, बाजारात एक अदृश्य हात असतो, मात्र केरळच्या निवडणुकीत सध्या भाजपचा अदृश्य हात काम करत आहे. ते म्हणाले, जे भाजपविरुद्ध लढतात त्यांच्यावर कारवाई होते.” माझ्यावर ३६ खटले आहेत, मला ५५ तास सतत चौकशीला सामोरे जावे लागल्याचे ते म्हणाले.

‘एलडीएफ’ नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप करत गांधी म्हणाले की, “त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. सर्वांना माहिती आहे की ‘एलडीएफ’चे नेते भ्रष्ट आहेत, पण भाजप त्यांच्यावर कारवाई करत नाही.” शबरीमला मुद्द्यावर ते म्हणाले, ‘पंतप्रधान जिथे जातात तिथे मंदिर आणि धर्माबद्दल बोलतात, पण पलक्कड येथे त्यांनी शबरीमला विषयाचा उल्लेखसुद्धा केला नाही.’ अय्यप्पा मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबतही मोदी यांनी मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. ‘यूडीएफ’ सत्तेत आल्यास मंदिरातील कथित गैरव्यवहारांसाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.