Rahul Gandhi on Dehradun Woman Remark: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून विरोधकांसह आता डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांचाही पाठिंबा घेतला आहे. मंगळवारी विरोधकांना एकत्र घेऊन राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ‘मत चोरी’ आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग तसेच केंद्र सरकारवर चौफेर हल्लाबोल करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तोफ डागतानाच, राहुल गांधी यांनी अचानक “सध्या देहरादूनमध्ये लपून बसलेली ती महिला…” असा गूढ उल्लेख केला. त्यांच्या या विधानानंतर ती महिला नेमकी कोण आणि तिचा या वादाशी काय संबंध? याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कथित ‘मत चोरी’विरुद्ध राजकीय लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देताना राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार आणि सध्या देहरादूनमध्ये लपून बसलेली ती महिला या सर्वांना कायद्याच्या चौकटीत खेचून जनतेला न्याय मिळवून दिला जाईल, हे आमचे वचन आहे.” राहुल गांधी यांनी त्या महिलेचे थेट नाव घेणे टाळले असले तरी काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून आणि राजकीय वर्तुळातून निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालक डॉ. सीमा खन्ना यांच्याकडेच हा रोख असल्याचे बोलले जात आहे.
कोण आहेत डॉ. सीमा खन्ना?
डॉ. सीमा खन्ना या २०२५ मध्ये प्रतिनियुक्तीवर निवडणूक आयोगात रुजू झाल्या. यापूर्वी त्यांनी ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’मध्ये काम केले आहे. एमटेक पदवीधर असलेल्या खन्ना यांनी आयआयटी दिल्लीमधून ‘माहिती सुरक्षा’ या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली आहे.
काँग्रेसचे माध्यम समन्वयक आणि राजकीय विश्लेषकांनी सोशल मीडियावर थेट प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींचा रोख सीमा खन्ना यांच्याकडे असल्याचे सूचित केले आहे. “आयोगाचा संपूर्ण डिजिटल डेटा अजूनही त्यांच्याच नियंत्रणात आहे. त्यांना कोण पाठीशी घालत आहे आणि त्या देहरादूनमध्ये काय करत आहेत?” असे सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आणि निवडणूक प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचा आढावा घेण्यासाठी खन्ना देहरादूनमध्ये उपस्थित असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वादाची नेमकी पार्श्वभूमी काय?
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानंतर सीमा खन्ना यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले. निवडणूक आयोगाच्या कामकाजातील अंतर्गत निर्णय आणि सॉफ्टवेअर प्रणालीतील बदलांवर गेल्या १० महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी तब्बल १४ वेळा तीव्र आक्षेप नोंदवले होते, अशी माहिती या वृत्तात दिली होती.
