काँग्रेसची चळवळ ही ‘एनआरआय’ अर्थात अनिवासी भारतीयांनी उभी केली. महात्मा गांधी अनिवासी भारतीय होते, पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लंडहून परतले होते, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल हे देखील अनिवासी भारतीयच होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’ या ठिकाणी अनिवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी ही भूमिका मांडली. गांधी, नेहरू आणि इतर सगळ्यांकडे भारताबाहेरच्या जगाचा अनुभव होता. भारतात परतल्यावर या सगळ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग देश उभारणीसाठी केला असेही त्यांनी म्हटले.

एवढेच नाही या सगळ्या नेत्यांनंतरही अनेक अशी अनिवासी भारतीय माणसे आहेत जे एनआरआय होते, मात्र देशाच्या उभारणीत त्यांनी मोलाचे सहकार्य केले. अनिवासी भारतीय खूप हुशार असतात त्यांच्याकडे अलौकिक प्रतिभा असते. ‘मिल्कमॅन’ अशी ख्याती असलेले मिस्टर कुरियन हे अनिवासी होते, सॅम पित्रोडा यांच्या रूपाने दुसरे उदाहरण दिले जाऊ शकते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील ज्यांनी भारताला प्रगतीपथावर नेले. भाजपला असे वाटते की देशात काहीही घडले नाही. मात्र हे सत्य नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

लघू आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग जर भारतात सशक्त झाले तर नोकरीच्या लाखो संधी तयार होतील. मात्र सध्या देशातील वातावरण बरे नाही. सहिष्णुता हरवली आहे. अनेक लोक यामुळे चिंताग्रस्त झालेत. भारत असहिष्णू देश का झाला हा जगातील अनेक अनिवासी भारतीयांना पडलेला प्रश्न आहे असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी ही भूमिका मांडल्यावर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला अर्थ नसल्याचे भाजप प्रवक्ते राम माधव यांनी म्हटले.