Rahul Gandhi vs Election Commission Supreme Court : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कायदेशीर विभागाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. अॅड. एस. प्रसन्न यांनी इंडिया आघाडीच्या वतीने सोमवारी ही याचिका दाखल केली. या याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता आहे. दरम्यान, इंडिया आघाडीचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर थांबला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या हजारो समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढला होता. सुरुवातीला भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) सूर्य कांत यांना निवेदन सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, मुख्य न्यायमूर्तींनी त्यांना भेटण्यास नकार दिला आणि न्यायालयात इतर पक्षकारांप्रमाणेच कायदेशीर मार्गाने येण्यास सांगितलं. त्यानंतर या नेत्यांनी रीतसर याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी हे याचिका दाखल करण्याच्या अंतिम वेळेत म्हणजेच सायंकाळी साडेचार पूर्वी सर्वोच्च न्यायालयात पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचे वकील एस. प्रसन्ना यांनी ही याचिका दाखल केली.
निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेशी संबंधित काही निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्तांनीच अनेक आक्षेप नोंदवले असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा मुख्य चेहरा आहेत. या याचिकेत राहुल गांधी यांना मुख्य याचिकाकर्ते करण्यात आले आहे.
या याचिकेत काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या इतर १० नेत्यांचाही समावेश आहे. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सौगत रॉय, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, संजय राऊत, एम. ए. बेबी, डी. राजा, महुआ माजी, सुप्रिया सुळे आणि ई. टी. मोहम्मद बशीर यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला या याचिकेवर आजच प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच यातील त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून मंगळवारी या प्रकरणाची सुनावणीसाठी नोंदणी (लिस्टिंग) करता येईल. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ मंगळवारी गांधी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याची शक्यता आहे. जर ही याचिका सोमवारी संध्याकाळपर्यंत दाखल झाली, तर त्यावर दुसऱ्याच दिवशी सुनावणी घेतली जाईल, असं मुख्य न्यायमूर्तींनी आपल्या उत्तरात म्हटलं होतं.
