Rahul Gandhi Mallikarjun Kharge Dalit Politics: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील सभेच्या जागेवर झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेत ज्यांनी शुद्धीकरण केले, त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपाने पलटवार केला आहे. अस्पृश्यता आणि खर्गे यांच्या दलित अस्मितेचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

हल्द्वानी येथील खर्गे यांच्या सभेनंतर त्या जागेचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ‘शुद्धीकरण’ केल्याचा आरोप करत, या प्रकरणी संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. या कृत्याला त्यांनी संविधानाचा अवमान ठरवले होते. खर्गे यांनी १३ ऑगस्ट रोजी संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला होता.

‘काँग्रेसमध्येच अस्पृश्यतेची भावना’ – गिरिराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पीटीआयशी बोलताना राहुल गांधींना लक्ष्य केले. “राहुल गांधी यांच्या मनात भारताविषयीच अस्पृश्यतेची भावना निर्माण झाली असून ते देशाला संकटात ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. अस्पृश्यतेची मानसिकता मुळात काँग्रेसमध्येच खोलवर रुजलेली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

हल्द्वानी येथील प्रकारावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “खरगेंचा त्याठिकाणी एक कार्यक्रम झाला. त्यांच्या व्यासपीठावरून काही गोष्टी बोलल्या गेल्या. त्या लोकांनी ऐकल्या. त्यानंतर दोन दिवसांनी तिथे दुसरा कुणी कार्यक्रम घेऊ शकत नाही का? कार्यक्रम घेणारे अनुसूचित जाती प्रवर्गातीलच मुले होती.”

काँग्रेसची अडचण अशी आहे की, ते कोल्ह्याला सिंहाचे कातडे पांघरण्याचा कितीही प्रयत्न करत असली, तरी कोल्हा तो कोल्हाच राहतो, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

‘राहुल गांधींकडे मुद्द्यांचा दुष्काळ’

भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही काँग्रेसवर टीका केली. “राहुल गांधींकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळेच ते पक्षाध्यक्षांच्या दलित अस्मितेचे राजकारण करत आहेत. ते कोणताही गृहपाठ न करता बोलतात. ‘वंदे मातरम्’, ‘मनुस्मृती’ किंवा अस्पृश्यतेचा विषय असो, प्रत्येक मुद्द्यावर ते तोंडघशी पडतात,” असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

बोलल्याप्रमाणे वागा, प्रकाश आंबेडकरांची टीका

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही रविवारी हल्द्वानीमधील शुद्धीकरण प्रकरणावरून काँग्रेसवर टीका केली. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या एक्स हँडलवर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका मांडण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शुद्धीकरणसारख्या जातीयवादी कृत्याविरोधात प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसने वेळ लावला. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी या कृत्याचा स्पष्ट निषेध न केल्याबद्दल स्वतः खरगे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सदर घटनेच्या १५ दिवसांनंतर राहुल गांधी यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेऊन शुद्धीकरण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या राहुल गांधींना पुढचा पंतप्रधान बनवण्याची तयारी करत आहेत. ही चांगली बाब आहे. पण आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना जेव्हा जातीयवादाचा सामना करावा लागतो. तेव्हा त्यावर गप्प बसणारे पक्षाचे नेते भाजपाच्या मनुवाद्यांपेक्षा चांगले कसे असू शकतात? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.