केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेला सुरुंग लावून देशात ‘मतचोरी’ला खतपाणी घातले जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील लोकशाहीची सद्यस्थिती आणि निवडणूक आयोगातील अनागोंदी कारभार याबाबत सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा खरगे यांनी रविवारी बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना केली.

उद्या, म्हणजेच सोमवारी दुपारी ४ ते ५ या वेळेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरन्यायाधीशांची भेट घेणार आहेत.

‘सरन्यायाधीशांसमोर न्यायाची मागणी करणार’

बंगळुरूतील पत्रकार परिषदेत बोलताना खरगे म्हणाले, “देशातील लोकशाही सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. आम्ही आणि राहुल गांधी यांनी भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. उद्या दुपारी ४ ते ५ दरम्यान ही भेट होईल. सर्वोच्च न्यायालयासमोर आम्ही देशातील परिस्थिती मांडणार आहोत. आम्ही त्यांच्याकडे कोणत्याही कायदेशीर आदेशाची मागणी करू शकत नाही, परंतु हात जोडून लोकशाहीच्या रक्षणासाठी विनंती नक्कीच करणार आहोत.”

मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर खरगे यांनी जोरदार ताशेरे ओढले. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक आणि स्वतंत्र संस्था आहे. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्त इतर सदस्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेऊ देत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला.

“आयोगाचे इतर सदस्य अंतर्गत गैरप्रकार आणि मनमानी कारभाराबाबत उघडपणे बोलत आहेत, तरीही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. हे सर्व केवळ ‘मतचोरी’चे सत्र सुरू ठेवण्यासाठीच केले जात आहे. अशाच प्रकारच्या मतचोरीच्या जोरावर केंद्र आणि विविध राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली गेली आहेत,” असा दावा खरगे यांनी केला.

‘२०२३ च्या कायद्याद्वारे अधिकाऱ्यांना अवाजवी संरक्षण’

केंद्र सरकारने २०२३ मध्ये पारित केलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त सेवा शर्ती कायद्यावरही खरगे यांनी तीव्र आक्षेप घेतला. या कायद्यामुळे निवडणूक आयुक्तांना अभूतपूर्व कायदेशीर संरक्षण मिळाल्याचे ते म्हणाले.

“मोदी सरकारने २०२३ मध्ये कायदा आणून मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर सदस्यांना असे संरक्षण दिले आहे, जे देशाच्या राष्ट्रपतींना किंवा सरन्यायाधीशांनाही मिळालेले नाही. निवडणूक आयुक्तांकडून कितीही गंभीर चुका झाल्या, तरी त्यांना आयुष्यभर कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून सूट देण्यात आली आहे. हा लोकशाहीवर डाका टाकण्याचा आणि जनतेचा कौल हिरावून घेण्याचा मोठा कट आहे,” असे खरगे म्हणाले.

‘३२ हजार पोलिसांचा पहारा; मोदी सरकार भीतीखाली’

देशात सध्या गृहमंत्री आणि पंतप्रधानांमुळे भीती आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले असून ‘अघोषित आणीबाणी’सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत खरगे यांनी शनिवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘सीजेपी’च्या (CJP) नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन चिरडण्यासाठी संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरूप आले होते. “एका शांततापूर्ण आंदोलनाला रोखण्यासाठी तब्बल ३२ हजार पोलिसांचा ताफा उतरवावा लागतो, यावरूनच सरकार किती भीतीखाली आहे हे स्पष्ट होते,” असा टोला खरगे यांनी शेवटी लगावला.