तृणमूल काँग्रेसच्या नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी रात्री उशिरा फोनवरून चर्चा केली. निवडणूक आयोगाने आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे मूळ नाव आणि पारंपरिक चिन्ह वापरण्यावर बंदी घातल्यानंतर ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. याबद्दल सविस्तर वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना “आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहोत”, असे सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये पुढील काळात विरोधकांची एकजूट आणि आघाडीबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

‘आपण एकत्र आहोत’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलताना बंगालमधून एकजुटीचा संदेश देण्याबाबत भाष्य केले.

“बंगालने एकजूट भारत आघाडीचा मार्ग दाखवावा आणि भाजपाला सत्तेतून दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे ममता यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

राहुल गांधी यांनीही, “आपण एकत्र आहोत. आपल्याला भाजपला हटवायचे आहे,” असे म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नंदीग्राममध्ये ममता गटाच्या उमेदवाराची माघार

दरम्यान, नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने उमेदवारी दिलेल्या संचिता प्रधान डे (दे) यांनी शुक्रवारी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. संचिता प्रधान डे या शिक्षिका असून शुक्रवारी दुपारी त्यांनी पती सत्यजित यांच्यासोबत राज्य सचिवालय नबन्ना येथे ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली.

तृणमूल काँग्रेसचं मूळ नाव आणि चिन्ह वापरण्यावर बंदी

तृणमूल काँग्रेसमधील दोन गटांकडून पक्षाचे नाव आणि पारंपरिक निवडणूक चिन्ह वापरण्यावर दावा केला जात होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने गुरुवारी ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि पारंपरिक चिन्ह दोन्ही गटांना वापरण्यास मनाई केली. यानंतर दोन्ही गटांना आगामी पोटनिवडणुकांसाठी स्वतंत्र नावे आणि मुक्त चिन्हांमधून पर्याय निवडण्यास सांगण्यात आले.

ममता गटाला ‘फुटबॉल खेळाडू’, दुसऱ्या गटाला ‘लिफाफा’

शुक्रवारी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह मंजूर केले. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले.

तर प्रतिस्पर्धी गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आले. दोन्ही गटांना पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या आदेशासंदर्भातील वृत्तांत नमूद आहे. या पोटनिवडणुका 6 ऑक्टोबरला होणार आहेत.