काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (१३ ऑगस्ट) एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह २० दिवसांपासून सभागृहात का आले नाहीत? मोदी पत्रकार परिषदा का घेत नाहीत? सध्याचं सरकार लोकांचं, विद्यार्थ्यांचं म्हणणं का ऐकून घेत नाही?असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी विचारले आहेत.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावरून जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेल्यानंतर जागतिक नेत्यांची गळाभेट घेत असतात. मात्र, याच मुद्यांवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
‘गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही’, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची मिमिक्री केली आहे. यावेळी राहुल गांधींनी व्यासपीठावरील एका नेत्याची गळाभेट घेतली. या गळाभेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“त्यांना (पंतप्रधान मोदींना) ही कल्पना कुठून सुचली, हे मला माहीत नाही. लोकांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात. मात्र, हे जेव्हा बाहेर जातात तेव्हा नेत्यांच्या गळाभेट घेतात. त्यांना वाटतं की हेच परराष्ट्र धोरण आहे”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका करत पंतप्रधान मोदींची मिमिक्री करून दाखवली.
‘जोपर्यंत मोदी राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत…’
“काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण विरोधी पक्ष आता आपली ठामपणे भूमिका मांडत आहे. ही प्रक्रिया थांबणार नाही. आता धन्यवाद, टाटा, गुडबायची वेळ आली आहे. माझे शब्द लक्षात ठेवा. जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देत नाहीत आणि अमित शाह पद सोडत नाहीत, तोपर्यंत त्या दोघांनाही आम्ही शांत झोपू देणार नाहीत. आम्ही त्यांना कायम जागतं ठेवू. जोपर्यंत ते हार मानत नाहीत आणि कबूल करत नाहीत की, हे आमच्या आवाक्याबाहेरचं आहे. आम्हाला माफ करा आणि आम्हाला जाऊ द्या. आम्ही हा लढा आपल्या देशाची मूल्ये व संस्कृती जपण्यासाठी लढत आहोत. कोणत्याही द्वेषाशिवाय आणि हिंसेशिवाय. आपला देश द्वेषाचा नाही तर स्नेह, प्रेम, बंधुभाव आणि अहिंसेचा आहे हे सिद्ध करून दाखवू”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी बनला, भारताने काय केलं?
“इराण आणि अमेरिका हे दोन्ही राष्ट्र भारताच्या जवळचे आहेत. या दोन देशांत युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांच्यातील आपले संबंध वापरण्याची मोठी संधी भारताने गमावली. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थ म्हणून पुढे आला आणि भारताला फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली. इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी देश बनला. मात्र, भारताने काय केलं?”, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.
