गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चानंतर अखेर सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता डी.के.शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार आहे. डी.के.शिवकुमार यांची ३० मे रोजी कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. आता डी.के.शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून ३ जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठे बदल केल्यानंतर आता काँग्रेसच्या ‘मिशन २०२७’ची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी मोठी रणनीती आखत जवळपास सहा राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेस हायकमांडने सहा राज्यांमध्ये काँग्रेसच्या युनिट्सची पुनर्रचना करण्याबाबत आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती स्तरावरील संघटनात्मक जबाबदाऱ्यांची पुनर्रचना करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पंजाब काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांना त्यांच्या पदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष नेतृत्वातील एका गटाची इच्छा आहे की माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर ही जबाबदारी दिली पाहिजे. कारण सध्या नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पंजाब काँग्रेसला अपयश आलं असून पंजाब काँग्रेसमधील गटबाजीची दरी अधिक वाढल्याची चर्चा आहे.
कोणत्या राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार?
काँग्रेस हायकमांड आगामी काळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. जवळपास सहा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत काँग्रेस नेतृत्व असल्याच्या चर्चा आहेत. पंजाब, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
केरळमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली
दरम्यान, केरळ विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. या सरकारमध्ये केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ हे व्ही.डी.सतीशन यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच केरळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी लोकसभा खासदार कोडिकुन्नील सुरेश, बेन्नी बेहनान आणि अँटो अँटनी यांच्यासह आदी नेत्यांच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत.
तमिळनाडू अन् कर्नाटकमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली
तमिळनाडूमध्ये के.सेल्वापेरुन्थागई यांना पदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यशैलीवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसेच कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेण्यास सज्ज असलेल्या डी.के. शिवकुमार यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या नेत्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी सतीश जारकीहोळी, बी.के.हरिप्रसाद यांच्यासह आदी नेत्यांच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत.
राजस्थानमध्येही प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली
राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा हे जुलै २०२० पासून या पदावर आहेत, त्यामुळे आता राजस्थान काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या नेत्याकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे अजय राय हे ऑगस्ट २०२३ पासून उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही राज्य युनिट्समध्ये सर्वोच्च पदावर बदल आवश्यक आहे का? याचा विचार नेतृत्व करत आहे.
आंध्र प्रदेशमध्येही प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली
तसेच काँग्रेस हायकमांड आंध्र प्रदेशमध्येही प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. कारण आंध्र प्रदेशमध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष वाय.एस.शर्मिला यांना कर्नाटकातून राज्यसभेवर नामनिर्देशित केलं जाण्याची शक्यता आहे. कारण त्यांना २०२४ च्या निवडणुकांपूर्वी पक्षात सामील होण्याआधी काँग्रेस नेतृत्वाने हे आश्वासन दिलं होतं अशा चर्चा आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस समिती स्तरावरही फेरबदल?
काही राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या बदलांव्यतिरिक्त अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) स्तरावरही मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्य प्रभारींच्या कामगिरीवर नेतृत्व असमाधानी आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात या बदलांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राहुल गांधी हे सर्वोच्च नेतृत्वात नवीन चेहऱ्यांना आणण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे.
डी.के.शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री?
सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून आता डी.के.शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना पायउतार होण्यास सांगितलं होतं. त्यानुसार सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याची जबाबदारी डी.के.शिवकुमार यांच्याकडे सोपवली जाणार आहे. काँग्रेस नेत्यांनीच डी.के.शिवकुमार यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जातं.
कर्नाटकात नेतृत्व बदल का?
कर्नाटकातील नेतृत्वाचा मुद्दा जवळपास वर्षभराहून अधिक काळ चर्चेत होता. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं असं सांगितलं जातं. त्यामुळे या मागणीवर डी.के.शिवकुमार यांचे समर्थक ठाम असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने सांगितली जाते. तसेच अडीच-अडीच वर्षाचं आश्वासन मिळाल्यामुळेच डी.के.शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा स्वीकार केला होता असंही सांगितलं जातं. त्यामुळे या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.
