Rahul Gandhi Lok Sabha Speech Narendra Modi Magician Remark: महिलांना संसद व विधिमंडळांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी प्रस्तावित विधेयकावर संसदेच्या विशेष तीन दिवसीय अधिवेशनात चर्चा चालू आहे. आज या विधेयकावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भाषणादरम्यान सविस्तर भूमिका मांडली. यावेळी एका जादूगाराची गोष्ट सांगून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जादूगाराची उपमा दिली. यावर सत्ताधारी बाकांवरून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. खुद्द अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील राहुल गांधींनी अशा शब्दांचा वापर न करण्याबाबत निर्देश दिले. सत्ताधारी बाकांवरून किरेण रिजिजू, राजनाथ सिंह या मंत्र्यांनीदेखील राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली.

राहुल गांधींनी सांगितलेली जादूगाराची गोष्ट

राहुल गांधींनी महिला विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महिला विधेयकाला लक्ष्य करण्यासाठी लहानपणी घडलेली जादूगाराची एक गोष्ट सांगितली. “मी आणि माझी बहीण लहानपणी एका जादूगाराचा खेळ बघायला गेलो होतो. त्यानं सुरुवातीला काही खेळ दाखवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग त्यानं स्वत:ला साखळ्यांनी बांधलं आणि कुलूप लावलं. वरून काळा कपडा टाकून घेतला. नंतर आत बरीच हालचाल झाली. पण जादूगाराला बाहेर येता आलं नाही. त्याच्या सहाय्यकांना नंतर त्यानं बोलावून काळा कपडा काढायला लावला. कुलूप उघडण्यात त्याला अपयश आलं. त्यानं जादू करण्यात एक चूक केली आणि त्याची जादू फसली”, असा किस्सा राहुल गांधींनी सांगितला.

“त्यानंतर जादूगारानं इतरही खेळ करून दाखवायचा प्रयत्न केला. पण यावेळी त्यावर टाळ्या न पडता उपस्थित सगळे हसू लागले. त्याच्या जादूचा प्रभाव संपला होता”, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कथेतील जादूगाराची उपमा देताच सत्ताधारी बाकांवरून गदारोळ झाला. “सत्य हे आहे की जादूगार पकडला गेला आहे. बालाकोट, नोटबंदी, ऑपरेशन सिंदूर या जादू फसल्या. जादूगार पकडला गेला”, असं राहुल गांधी म्हणाले. त्यावर किरण रिजिजू यांनी तीव्र नाराजी नोंदवली. इतरही सत्ताधारी खासदारांनी गदारोळ केला.

सत्ताधाऱ्यांचा नेमका आक्षेप काय होता?

किरेन रिजिजूंनी लोकसभा नियमावली वाचून दाखवताना पंतप्रधानच काय, मंत्र्यांनादेखील जादूगार म्हणणं नियमबाह्य असल्याचं ते म्हणाले. तसेच, बालाकोट, ऑपरेशन सिंदूरला जादू संबोधून राहुल गांधींनी आपल्या लष्कराचा, जवानांचा अपमान केला आहे, पंतप्रधानांना जादूगार म्हणून त्यांना निवडून दिलेल्या १४० कोटी देशवासीयांचा राहुल गांधींनी अपमान केला आहे, अशा शब्दांत किरेन रिजिजू व राजनाथ सिंग यांनी आक्षेप नोंदवला. तसेच, राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही केली.

rahul-gandhi-injured-hand

राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

यानंतर राहुल गांधींनी भाजपावर हल्लाबोल केला. “भाजपाच्या मनात एक मूलभूत संभ्रम आहे. त्यांना वाटतं की ते म्हणजे भारताचे नागरिक आहेत. पण भारताचे नागरिक हा वेगळा घटक आहेत. त्यांना असंही वाटतं की ते म्हणजे भारताचं लष्कर आहे. पण तुम्ही लष्कर नाही. ते वेगळं आहे. तुम्ही एक राजकीय पक्ष आहात. तुम्ही भारत नाहीत आणि भारताचं लष्करही नाहीत. आम्ही भारतावर टीका करत नाही, भारताच्या लष्करावरही टीका करत नाही. आम्ही तुमच्यावर हल्ला करतोय. तुम्ही भारताच्या नागरिकांच्या पाठिशी किंवा लष्कराच्या पाठिशी लपू नका. घाबरटाप्रमाणे भारताच्या लोकांच्या किंवा लष्कराच्या पाठिशी लपणं बंद करा आणि समोरासमोर येऊन आमच्याशी चर्चा करा”, असं आव्हान राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना दिलं.

काय आहे १६ नंबरचं कोडं?

दरम्यान, आपल्या भाषणात राहुल गांधींनी १६ क्रमांकाचा सूचक उल्लेख करत त्याचा अर्थ लावण्याचं आवाहन सत्ताधाऱ्यांना केलं. “काल पंतप्रधान मोदी बोलत असताना भाषणात एकदम निष्प्रभ वाटत होते. मग मला लक्षात आलं की काल १६ एप्रिल तारीख होती. सगळ्या शंकांची उत्तरं १६ नंबरमध्ये आहेत. जर कुणालाही मी काय सांगतोय त्याचं उत्तर मिळालं तर तुम्ही मला ते पाठवा. सत्ताधाऱ्यांना लवकरच त्याचं उत्तर मिळेल. नंबर १६”, असं म्हणून राहुल गांधींनी आपलं भाषण संपवलं.

…म्हणून राहुल गांधींचा महिला विधेयकाला विरोध

आपल्या भाषणात महिला विधेयकाबाबत राहुल गांधींनी सविस्तर भूमिका मांडली. “आज या सभागृहात काही सत्ये सांगण्याची गरज आहे. पहिलं सत्य म्हणजे हे काही महिलांसाठीचं विधेयक नाही. एक महिला विधेयक २०२३ मध्ये याच सभागृहात पारित झालं होतं. भाजपातले माझे मित्र आणि शिक्षक तेव्हा म्हणाले होते की ते विधेयक येत्या १० वर्षांत अंमलात आणलं जाईल. ते खरं विधेयक होतं. आत्ताचं विधेयक हे महिलांच्या आडून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. ही लाजिरवाणी कृती आहे. प्रत्येक विरोधक खासदार २०२३ च्या विधेयकाला पूर्णपणे समर्थन देतो. आत्ता ते आणा, ते आपण आत्ता पारित करू. पण सरकारनं आत्ता आणलेलं विधेयक वेगळं काहीतरी आहे”, असं ते म्हणाले.

अमित शाहांच्या ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख

“या विधेयकात जातनिहाय जनगणनेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ते ओबीसींना ताकद देण्यापासून, प्रतिनिधित्व देण्यापासून पळ काढत आहेत. हा या विधेयकाचा हेतू आहे.संविधानावर मनुवादाला प्राधान्य दिलं जात आहे. अमित शाह म्हणतात की जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. काल त्यांनी हे दोनदा सांगितलं की संसदेच्या सभागृहांना जात नाही. इथे सभागृहांना जात आहे की नाही हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की संसदेच्या सभागृहांमध्ये प्रतिनिधित्व ठरवण्यासाठी जातनिहाय जनगणनेचा वापर केला जातो की नाही. तुम्ही पुढची १०-१५ वर्षं प्रतिनिधित्वाशी जातनिहाय जनगणनेचा काही संबंधच नाही हे ठसवण्याचा प्रयत्न करत आहात”, असंही ते म्हणाले.

दुसरं म्हणजे देशाच्या राजकारणात जे काही घडतंय त्यामुळे तुम्ही घाबरले आहात. त्यामुळे तुम्ही भारताचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहात. त्यासाठी तुम्ही घटनादुरुस्ती आणत आहात. तुम्ही दक्षिण भारतातील, पूर्वेकडील राज्यांना, छोट्या राज्यांना हे सांगताय की भाजपाला सत्तेत ठेवण्यासाठी आम्ही तुमच्याकडून प्रतिनिधित्वंच काढून घेत आहोत. हे पूर्णपणे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला हे करू देणार नाही. संपूर्ण विरोधी पक्ष तुम्हाला हे करण्यापासून रोखणार आहे.