राहुल गांधी यांनी आता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. राहुल गांधीनी त्यांची आई व काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी. तसेच देशातील जनतेशी संवाद व संपर्क साधण्यासाठी त्यांनी भारत यात्राही करावी’ असे मत त्यांनी व्यक्त केले. राहुल गांधींनी लवकरात लवकर पक्षाची सूत्रे हाती घेणे फायदेशीर ठरेल. त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाभोवती जमा झालेले शंकांचे मळभ दूर होईल, असे मत काँग्रेस पक्षातून सध्या व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक दारूण पराभवानंतर महाराष्ट्र व हरयाणासारखी महत्त्वाची राज्ये गमावणाऱ्या काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन वर्ग सुरू झाल्याचीही चर्चा आहे. यानुसार, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी शुक्रवारी दिल्लीत चर्चा केली होती. या चर्चेतून राहुल गांधी पक्षाला नवसंजीवनी देण्याचा मार्ग शोधत असल्याचे समजते. राहुल गांधी यांनी जेष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, कॅप्टन अमरिंदर, जनार्दन द्विवेदी, गिरिजा व्यास व प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन यांच्याशी चर्चा केली. याशिवाय, पक्षांतर्गत बदलांसाठी राहुल गांधी गेल्या दोन दिवसांपासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत.