नीट पेपरफुटीच्या मुद्यांवरून दिल्लीत जंतर-मंतर या ठिकाणी देशभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिबा मिळाला होता. या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, या आंदोलनादरम्यान २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता, यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना समोर आली होती.

तसेच काही विद्यार्थ्यांवर कथित पॅलेट गन्सचा वापर झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसह पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना ‘तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, तुम्हाला कोणाचीही माफी मागण्याची गरज नाही’, असं म्हटलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांकडून कोणतीही हिंसा झाली नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गांधी म्हणाले की, “मी आंदोलन करणाऱ्या तरुणांशी चर्चा केली. शिक्षण व्यवस्था, संविधान आणि भारताच्या भविष्यासाठी लढा देणाऱ्या हजारो तरुणांचे मी आभार मानतो. आमची चर्चा प्रामुख्याने हिंसाचाराच्या मुद्द्यावर झाली. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी कोणताही हिंसाचार केला नाही. पण तरीही विद्यार्थ्यांना सतत छळाचा सामना करावा लागत आहे. त्यांना धमकावण्यात आलं, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, मारहाणही झाली”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“जेव्हा अन्याय होतो, तेव्हा त्या व्यक्तीचं रक्षण करणं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते. त्यामुळे तुम्ही (विद्यार्थ्यांनी) काहीही चुकीचं केलेलं नाही आणि तुमची माफी स्वीकारण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कोणाचीही माफी मागण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. खरं तर या सर्व आंदोलकांचा मला अभिमान वाटतो, कारण त्यांनी भारताच्या भविष्यासाठी लढा दिला”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मुस्कान शर्मा या विद्यार्थिनीने काय म्हटलं?

“माझं नाव मुस्कान, मी हे सांगू इच्छिते की जंतर-मंतरवर जे आंदोलन झालं ते शांततेच्या मार्गाने करणाऱ्यांमधली मी एक आंदोलक होते. माझा प्रश्न हा आहे की जेव्हा मी शांततेने चालत होते तेव्हा मला पोलिसांनी मारहाण का केली? माझ्यावर लाठी का चालवली गेली? मांडीच्या वर मला मारलं गेलं जे नियमबाह्य आहे. तसंच पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर लाठी कशी चालवली? कारण असं करणंही नियमबाह्य आहे. एका पुरुष अधिकाऱ्याने अत्यंत चुकीचं वर्तन केलं. तो ऑफिसर कोण होता? त्याला असं वागण्याची मुभा कुणी दिली होती? त्याने जर येऊन माझी माफी मागितली तर मला समाधान वाटेल. माझं नाव मुस्कान आहे पण मी सांगू इच्छिते माझं नाव मुस्कान शर्मा असं आहे. मी माझं आडनाव सांगते आहे कारण आजकाल सगळे हे समजत आहेत की मी मुस्लिम आहे आणि मला त्यामुळे आणखी शिव्या दिल्या जात आहेत. त्यामुळे देशात कुठला नरेटिव्ह कसा सेट होतोय याचं हे उदाहरण आहे. सरकारच्या विरोधात जर मुस्लिम माणूस बोलला तर तो अँटी नॅशनल कसा होतो? हे नरेटिव्ह जास्त पसरतं आहे. त्यामुळे देशात काय चाललंय याचा अंदाज येतो”, असं मुस्कान शर्माने म्हटलं.