Rahul Gandhi Net Worth Affidavit Rahul Gandhi Education Property Details: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार असणाऱ्या राहुल गांधींनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण २० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. यामध्ये ४.२ लाख रुपयांच्या सोन्याचा समावेश असून, त्यांच्या नावावर कोणतेही स्वतःचे निवासी फ्लॅट किंवा मोटार वाहन नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील

राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात ९,२४,५९,२६४ रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. यात ४,३३,६०,५१९ रुपयांचे शेअर्स, ३,८१,३३,५७२ रुपयांचे म्युच्युअल फंड्स, बँकेत २६,२५,१५७ रुपयांची शिल्लक आणि १५,२१,७४० रुपयांच्या सॉव्हरिन गोल्ड बाँड्सचा समावेश आहे.

राहुल गांधींनी ११,१५,०२,५९८ रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. यात ९,०४,८९,००० रुपयांची स्वतः विकत घेतलेली आणि २,१०,१३,५९८ रुपयांच्या वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचा समावेश आहे. राहुल गांधींच्या नावावर कोणतेही स्वतःचे निवासी फ्लॅट किंवा मोटार वाहन नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

इतर

राहुल गांधी यांच्याकडे ५५,००० रुपयांची रोकड असून ३३३.३ ग्रॅम सोने आणि दागिने, ज्यांचे मूल्य ४,२०,८५० रुपये आहे. त्यांच्यावर ४९,७९,१८४ रुपयांचे कर्ज आहे.

राहुल गांधी (फोटो – X/ Rahul Gandhi)

जमीन आणि व्यावसायिक मालमत्ता

राहुल गांधी यांच्या स्थावर मालमत्तेमध्ये नवी दिल्लीतील मेहरौली येथील सुलतानपूर गावातील सुमारे ३.७७८ एकर शेतजमिनीचा समावेश असून, यात बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांची सहमालकी आहे. याशिवाय, गुरुग्राममधील ‘सिग्नेचर टॉवर्स’मध्ये ५,८३८ चौ. फुटांचे व्यावसायिक फ्लॅट्स असून, त्यांच्या या दोन व्यावसायिक मालमत्तांचे बाजारमूल्य सुमारे ९.०५ कोटी रुपये आहे.

उत्पन्न

खासदार म्हणून मिळणारे वेतन, रॉयल्टी, भाडे, बाँड्सवरील व्याज, लाभांश (डिव्हिडंड) आणि म्युच्युअल फंड्समधील भांडवली नफा हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात १,०२,७८,६८० रुपयांचे उत्पन्न जाहीर केले आहे, तर २०२१-२२ मध्ये हेच उत्पन्न १,३१,०४,९७० रुपये होते.

राहुल गांधी (फोटो – X/ Rahul Gandhi)

शैक्षणिक पात्रता

प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एम.फिल. केलं आहे. तसेच त्यांनी फ्लोरिडाच्या रोलिन्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी पूर्ण केली आहे.