टाटा समूहाला जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केल्यानंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. या वादात राहुल गांधींनी पुन्हा पलटवार करत, टाटा ट्रस्ट्स आणि टाटा सन्सच्या प्रतिनिधींना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बोलावण्याचे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
राहुल गांधींचे आरोप आणि अर्थमंत्र्यांचे प्रत्युत्तर
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत, केंद्र सरकारकडून टाटा समूहाला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू असून उद्योजक भीतीपोटी गप्प असल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी, राहुल गांधींनी प्रत्येक मुद्द्याचे राजकारण करणे थांबवावे आणि व्यावसायिक बाबींना विनाकारण गुन्हेगारी स्वरूप देऊ नये, असे म्हटले.
भारतीय उद्योगजगताला पाठबळ देणे, शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि तरुणांचे भविष्य सुरक्षित करणे ही राजकीय पक्ष, नेते, सरकार आणि संस्थांची समान जबाबदारी असल्याचेही सीतारमण यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी निराधार आरोप करण्याऐवजी विधायक चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केलं. अखेरीस, “राहुलजी, सर्वत्र भुतं पाहणं थांबवा,” असा टोलाही त्यांनी लगावला.
राहुल गांधींचे दोन नवे प्रश्न
निर्मला सीतारमण यांच्या टीकेनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले. त्यांनी अर्थमंत्र्यांना उद्देशून ‘डिअर मिसेस सीतारमण’ असे म्हणत दोन प्रश्न उपस्थित केले.
“टाटा ट्रस्ट्स आणि टाटा सन्सच्या प्रतिनिधींना अमित शाह यांच्या निवासस्थानी बोलावण्याची गरज कोणत्या ‘कायदेशीर आणि व्यावसायिक’ बाबीमुळे निर्माण झाली?” असा पहिला प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. तसेच, “क्रोनी क्रमांक एक या प्रकरणात कधी प्रवेश करणार आणि टाटा समूहाचे कोणते भाग त्याच्या ताब्यात जाणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
देशातील तीन-चार उद्योगपती वगळता इतर सर्व भारतीय उद्योगपती सरकारवर नाराज असल्याचा दावा करत, त्यांना कोणाकडूनही चिथावणी देण्याची गरज नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
