The Mystery of Number 16: संसदेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन वादळी चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधेयकांवर बोलताना सरकारच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका देखील केली. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालाकोटचे जादूगार असा उल्लेख केल्याने सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. गांधी यांनी संसदेतील भाषणाचा शेवट करताना १६ या आकड्याचा उल्लेख केला. या आकड्याचे कोडं नक्की काय आहे? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

१६ नंबरचे कोडं नक्की काय?

राहुल गांधी यांनी १६ या आकड्याचा उल्लेख करुन अनेकांना कोड्यात टाकलं आहे. गांधी यांनी टाकलेल्या या कोड्याचा अर्थ लावण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. गांधी यांच्या १६ या आकड्याचा अर्थ टीडीपीचे १६ खासदार असा होतो की, १६ मिनिटांचा वादग्रस्त स्कँडलचा समोर आलेला व्हिडीओ याचा तो संदर्भ आहे का? याबाबत आता तर्क वितर्क लावले जात आहे. राहुल गांधी यांनी देखील याप्रकरणी भाष्य करताना हे कोडं ज्यांना उलघडलं त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करावे, असेही सूचवले.

राहुल गांधी काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी काल लोकसभेत बोलत होते, त्यावेळी पाहत होतो. कमी एनर्जीमध्ये पंतप्रधान बोलत होते. यानंतर माझ्या लक्षात आले की तो दिवस १६ एप्रिल आहे, ते संवाद साधू शकले नाहीत, कारण हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न म्हणजे एक चूक होती हे त्यांना स्पष्ट होते. ते मंजूर होणार नाही हे सर्वांनाच माहीत होते आणि त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती,” राहुल गांधी यांनी या क्षणाचे साक्षात्कार असा उल्लेख केला.

लवकरच मिळेल उत्तर – राहुल गांधी

“ते (नरेंद्र मोदी) बोलत असताना मी पाहत होतो, मोबाईलमध्ये १६ एप्रिल असल्याचे समजले. हाच तो नंबर, १६. सर्व कोडं १६ क्रमांकाचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आता कोणाच्या हे लक्षात आले असेल तर मला संदेश पाठवा आणि एक्सवर मला सांगा ते नक्की काय आहे. पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, ते १६ या क्रमांकात आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.