बिहारमधील जमुईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला काही तरुणांनी अडवून त्यांच्यावर हल्ला करत त्या मुलीची छेडछाड केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेवरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी पोस्ट शेअर करत बिहार सरकारला जाब विचारला आहे. ‘बिहारमधील रस्त्यांवर संध्याकाळी ७ वाजता एखादी तरुणी सुरक्षित का नाही? याचं उत्तर बिहार सरकारने द्यावं’, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
“बिहारच्या जमुई येथील एक व्हिडीओ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला आणि मुलीला रस्त्यावर बळजबरीने अडवण्यात आलं. त्यांना त्रास देऊन त्यांचा अपमान करण्यात आला, त्या मुलीची छेडछाड करण्यात आली. ती मुलगी हात जोडून आपल्याला सोडून देण्याची विनवणी करत होती, तरीही त्या गुंडांनी तिच्याशी झटापट केली. या लोकांना इतक्या उद्धटपणे वागण्याचा अधिकार कोणी दिला? ही पितृसत्ताक मानसिकता आहे”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.
“त्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवली गेली पाहिजे, दोषींवर पोक्सो कायद्यांतर्गत खटला चालवून त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. तसेच जर ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली असेल तर दोषींना अजूनही अटक का करण्यात आली नाही? संध्याकाळी ७ वाजता रस्त्यांवर एखादी मुलगी सुरक्षित का नाही? याचं उत्तर बिहार सरकारने दिलं पाहिजे”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
व्हिडीओत काय दिसतं आहे?
अल्पवयीन मुलगी आणि मुलगा रस्त्याने जात असतात. तेवढ्यात त्यांच्याभोवती एक जमाव येतो. हा जमाव या जोडप्याला मारहाण करू लागतो. त्यानंतर या जमावतले काही लोक मुलीचे कपडे फाडतात आणि तिचा विनयभंग करतात. ही मुलगी या जमावाला असं करू नका असं म्हणत विनंती करते. पण तिला उचलून एक जण दूर घेऊन जातो तिच्याशी असभ्य वर्तन करतो. असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे.
