मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची, तर मध्यप्रदेशात भाजपा आणि तेलंगणात भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. आता काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर, राजस्थानमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, “आम्ही तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जिंकत आहोत. पण, राजस्थानमध्ये जिंकण्याच्या जवळ आहोत. काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास आम्हाला आहे. भाजपाच्या अंतर्गत सुद्धा हीच चर्चा आहे.”

हेही वाचा : लोकसभेत शिवीगाळ झालेल्या मुस्लीम खासदाराची राहुल गांधींनी घेतली भेट, भावूक होत बसपा नेते म्हणाले…

भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून लोकांना विचलित करण्याचं काम भाजपा करत आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

हेही वाचा : मध्य प्रदेश : भाजपाची ‘जन आशीर्वाद’ तर काँग्रेसची ‘जन आक्रोश यात्रा’, जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न!

“बिधुरी यांच्यानंतर निशिकांत दुबे यांचं विधान तुम्ही पाहा. भाजपाचे नेते जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जातनिहाय जनगणना ही भारतातील जनतेला हवी असणारी मूलभूत गोष्ट आहे, हे भाजपाला माहिती आहे. म्हणून त्यावर भाजपाला चर्चा करायची नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Story img Loader