Ram Mandir Donation Protest Parliament: नीट पेपरफुटी आणि दिल्लीत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून उचलून धरला. संसदेच्या दोन्ही सभागृहात परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आता विरोधक राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणावरुन आक्रमक झाले आहेत. संसदेच्या परिसरात आज विरोधकांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचे नाट्य रुपांतर करुन सरकारवर टीका केली. राम मंदिरातील पुजाऱ्यांना दिलेली देणगी घेऊन पळून जातात अशा पद्धतीचे नाट्य यावेळी संसदेच्या परिसरात सादर करण्यात आले. पप्पू यादव आणि राहुल गांधींनी या छोट्याशा नाटीकेत सहभाग घेतला होता. यावेळी विरोधकांनी अर्धगोल करुन घोषणाबाजी केली.
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचे विरोधकांकडून नाट्य रुपांतर
संसदेच्या परिसरात आज सर्व विरोधी पक्षातील खासदारांनी एकत्र येत राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी निदर्शन केले. यावेळी देणगी गैरव्यवहार घटनेचे नाट्य रुपांतर करण्यात आले. खासदार पप्पू यादव पुजाऱ्याची वेषातील कपडे परिधान करुन बसले होते. त्यांच्यासमोर दोन ते तीन देणगीच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी राहुल गांधी देणगी घेऊन येतात आणि दान पेटीत पैसे टाकतात, दरम्यान, दान पेटीत पैसे टाकल्यानंतर पप्पू यादव दानपेटी घेऊन पळून जातात, अशा पद्धतीने हे पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षातील खासदार अर्धगोल करुन उभे राहिले होते.
येथे पाहा व्हिडीओ
काँग्रेसकडून टीका
“राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार करुन भाजपा-आरएसएसने देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे, हे महापाप आहे”, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. “देणगी चोर – सिंहासन सोडा”, असेही काँग्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षातील खासदार उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शाहांवर टीका
गृहमंत्री अमित शाह संसदेतून गायब का आहेत? असा प्रश्न देखील विरोधकांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला. विरोधकांनी ‘अमित शाह संसद से गायब क्यों?’ असा बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी केली.
“केवळ विरोधी पक्षांकडूनच नव्हे, तर संपूर्ण देशाकडून हा प्रश्न विचारला जात आहे. विद्यार्थ्यांवरील अत्याचाराबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलेच पाहिजे. शाह उत्तर देऊ शकले नाहीत, तर नरेंद्र मोदींनी त्यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे”, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
